करण जोहरने NCBच्या नोटिसीला दिलं उत्तर; म्हणाला, पार्टीत…

मुंबई – अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) पाठवलेल्या नोटिसीला बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने उत्तर दिले. त्यामधून त्याने मागील वर्षी त्याच्या घरी झालेल्या पार्टीत अंमली पदार्थांचे (ड्रग्ज) सेवन झाले नसल्याचा दावा केला.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून बॉलीवूडचे ड्रग्ज कनेक्‍शन समोर आले. त्यामुळे बॉलीवूडचे काही कलाकार एनसीबीकडून सुरू असलेल्या चौकशीच्या घेऱ्यात आले आहेत. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला.

करणच्या घरी मागील वर्षी एक पार्टी झाली. त्यामध्ये काही आघाडीचे कलाकार सामील झाले होते. त्या पार्टीशी निगडीत तो व्हिडीओ आहे. त्या पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन झाल्याचा आरोप करणारी तक्रार एनसीबीकडे दाखल करण्यात आली. त्यावरून एनसीबीने व्हिडीओच्या सत्यतेची पडताळणी करण्याच्या उद्देशातून करणला नोटीस बजावली.

उत्तरादाखल करणने पार्टीत ड्रग्जचे सेवन झाल्याचा इन्कार केला. याआधी व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे करण वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यावेळी त्याने एक निवेदन जारी करून एनसीबीला दिलेल्या उत्तराप्रमाणेच भूमिका मांडली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.