संगमनेर -लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बसची व्यवस्था केल्याने संगमनेर परिसरातील 462 उत्तरप्रदेशकडे रवाना झाले.
संगमनेर येथून उत्तरप्रदेशमधील 462 परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या बस, फुड पॅकिंग, प्रवास खर्चाची व्यवस्था करत ना. थोरात यांनी मदतीचा हात दिला.
यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, सुभाष पाटील गुंजाळ, अभिजित बेंद्रे, प्रांताधिकारी शशिकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम, उपस्थित होते. संगमनेर तालुका व परिसरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ना. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या बसमध्ये मागील तीन दिवसापूर्वी मध्यप्रदेशमधील 95 परप्रांतीय मजुरांना खाद्य पाकिट व प्रवास खर्च देण्यात आला.
ना. थोरात यांच्या सूचनेनुसार आमदार डॉ. सुधीर तांबे व थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरप्रदेशमधील 462 मजूरांना पोहोचविण्यासाठी अमृतवाहिनी शिक्षण विकास संस्थेच्या चार बस व शासनाची एक बस अशा पाच बसची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी या सर्व 462 मजुरांना खाद्याचे पाकीट व प्रवासाची व्यवस्था औषधोपचाराचे साहित्य हे सोशल डिस्टन्स व शासनाचे सर्व नियम पाळून त्यांची नगर येथे पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. उत्तरप्रदेशमधील 462 परप्रांतीय मजुर, महिलांनी ना. थोरात व संगमनेरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. या सर्वांनी माणुसकीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.