पाटणा – बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ विक्रमी नवव्यांदा घेणारे जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार शक्तिपरीक्षेला सामोरे जाणार आहेत. नवे नितीश सरकार १० फेब्रुवारीला विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे.
बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बहुमत सिद्ध करण्याचा नितीश यांचा इरादा आहे. त्यांनी नुकतीच राजद आणि कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या महाआघाडीची साथ सोडली.
पुन्हा भाजपशी मैत्री करत नितीश यांनी स्वत:च्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन केले. त्या घडामोडीनंतर नवे सरकार बहुमत सिद्ध करण्यासाठी सरसावले आहे. जेडीयू, भाजप आणि मित्रपक्षांकडे पुरेसे संख्याबळ असल्याने नितीश यांचे सरकार शक्तिपरीक्षेत लीलया बाजी मारेल असे चित्र आहे.