मुंबई – प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत देसाई यांनी आपलं आयुष्य संपवलं. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आता त्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन चंद्रकांत देसाई यांचे पोस्टमॉर्टम बुधवारी जेजे रुग्णालयात चार डॉक्टरांच्या टीमने केले. निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. दरम्यान, चार डॉक्टरांच्या पथकाने कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे शवविच्छेदन केले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाले आहे. पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली.
एन डी स्टुडीओमधील ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या मालिकेच्या सेटवर देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिली.यावेळी देसाई यांनी एक चिठ्ठी लिहीत त्यात आपल्या अंतिम विधीबाबतची इच्छा देखील व्यक्त केली असल्याचे एन डी स्टुडीमधील एका कर्मचाऱ्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.
देसाई यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांचा अंत्यविधी त्याच ठिकाणी करण्यात यावा अशी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार सहा नंबरच्या ग्राउंडवर त्यांचा अंत्यविधी होणार असल्याचे तेथील कर्मचाऱ्याने वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.
ऑडिओ क्लिपमध्ये उद्योगपतींची नावे?
देसाईंनी गळफास घेतला त्या जागी पोलिसांना एक व्हॉईस रेकॉर्डर सापडल्याची माहिती आहे. तसेच त्यात सुसाइड करण्यापूर्वी त्यांनी काही व्हॉइस क्लीप रेकॉर्ड करत त्यात 4 उद्योगपतींची नावे घेतल्याचा दावा केला जात आहे. देसाई यांनी मंगळवारी रात्री दिल्लीहून मुंबईला आले. त्यानंतर मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ते एनडी स्टुडिओत पोहोचले. तिथे त्यांनी आपल्या मॅनेजरला बोलावले. तुला उद्या सकाळी मी व्हॉइस रेकॉर्डर देतो, असे ते त्यांना म्हणाले. त्यांच्या सूचनेनुसार मॅनेजरने बुधवारी रेकॉर्डर घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सकाळी मेगाहॉलजवळ त्यांचा मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. त्यावेळी हा व्हॉइस रेकॉर्डर त्यांच्या मृतदेहाच्या बाजूलाच पडला होता. पोलिसांनी तो जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.