बंदला सर्वस्तरांतून उत्स्फूर्त पाठिंबा : करोनावर मात करण्यासाठी कंबर कसली
बारामती – करोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारापेठा बंद ठेवण्याचा आदेश आहे. या आदेशाचे पालन करीत बारामती शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शहरात रस्त्यांवरील निरव शांतता दिसून आली. यावरून करोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी बारामतीकरांनी कंबर कसल्याचे दिसून आले.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत बारामतीकरांची उत्स्फूर्तपणे बंद पाळला आहे. गुढीपाडव्याचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, असे असताना बारामतीची बाजारपेठ बंदमुळे ओस पडली आहे. गर्दी टाळण्यासाठी शासनाने राबवलेल्या उपाययोजनेत बारामतीकर देखील सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील टपरीपासून ते शॉपिंग मॉलपर्यंत सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे.
तीन दुकानदारांवर गुन्हा
करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वत्र बंद पाळण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावणाऱ्या तीन दुकानदारांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.
तीन दिवस दुकाने सुरू करण्याची मुभा द्या
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामतीकर सज्ज आहेत. मात्र, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तासाठी खरेदीची लगबग बारामतीच्या बाजारपेठेत नेहमीच असते. त्यासाठी व्यापाऱ्यांनी दोन महिन्यांपासून तयारी केली आहे. भांडवल गुंतवून माल खरेदी केला आहे. सध्या शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार हे तीन दिवस दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे व्यापारी महासंघाने केली आहे.