पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये यावर्षी करोना विषाणूमुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मूर्तीदान व निर्माल्य दान राबविले जाते. मागीलवर्षी 33 टन निर्माल्य दान प्रतिष्ठानकडे आले होते. तर यंदा फक्त 7 टन निर्माल्य दान झाले आहे.
शहरामध्ये करोना संक्रमण असल्याने प्रशासनाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. तसेच विसर्जनासाठी घाटही बंद ठेवण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. यावर्षी अनेक नागरिकांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली नाही. तसेच या गणेशोत्सवात फुलांचे दर विक्रेत्यांनी पाचशे रुपयांपर्यंत नेऊन पोहचविले होते.
तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत इतर पूजा साहित्य देखील दोन ते तीन पटीने महागले होते. करोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या भाविकांनी विक्रेत्यांकडून लादण्यात आलेल्या महागाईत हात आखडता घेतला. यामुळे यावर्षी खूप कमी फुले आणि पूजा साहित्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे निर्माल्यदान मागीलवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी झाले.
मागीलवर्षी 52 हजार 577 मूर्तींचे दान प्रतिष्ठानकडे आले होते. तसेच 33 टन निर्माल्य जमा झाले होते. यंदा 31 हजार 754 मूर्तींचे दान मिळाले तर 7 टन निर्माल्य दान आले. म्हणजेच यावर्षी तब्बल 26 टन कमी निर्माल्य दान प्रतिष्ठानकडे आले आहे. तसेच मूर्तींचेही दान कमी झाले. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने जमा झालेले निर्माल्य महापालिकेच्या गांडूळ खत प्रकल्पासाठी देण्यात आले. करोना विषाणूच्या संक्रमणामुळे यंदा नागरिकांनी गणपतीची स्थापना केली नाही. त्यामुळेच मूर्ती संकलन व निर्माल्य दान कमी आले असल्यांचे संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी सांगितले.