शेवगाव (प्रतिनिधी) : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्जव व ‘करोनाचे संकट लवकर दुर करा’ अशी प्रार्थना करत शेवगाव शहरासह तालुक्यातील ९० गणेश मंडळानी काल, मंगळवारी अकराव्या दिवशी आपापल्या मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाला अत्यंत साधेपणाने निरोप दिला.
यावेळी कुठेही गुलालाची उधळण,फटाके-तोफांची आतषबाजी, ढोल ताशा व डीजेचा दणदणाट झाला नाही. विविध प्रकारचे लेझीम, झांज, तलवारबाजीचे डाव रंगले नाहीत की, त्या निमित्ताने होणारे सांस्कृतिक कार्यक्रम वा देखावे झाले नाहीत .गणेशोत्सवाच्या सव्वासे वर्षाच्या इतिहासात लाडक्या गणरायाला प्रथमच अशा पद्धतीने निरोप देण्यात आला.
तालुक्यालाही गणेशोत्सवाची मोठी समृध्द परंपरा आहे. येथील लाटे गणेश मंडळ हा शेवगावातील मानाचा पहिला गणपती थेट लोकमान्य टिळकांच्या काळात बापू दादाजी लाटे व राघोबा भारदे यांनी आपल्या वाड्यात १८९५ ला बसविला होता. ती परंपरा त्यांची चौथी पिढी महेश लाटे व अचल लाटे या बंधूंनी जोपासली आहे .
तालुक्यातील आव्हाने खुर्दच्या गणपतीचा उल्लेख गणेश पुराणात आहे. येथील मूर्ती पहुडलेल्या स्थितीत असून अशी आगळीवेगळी मूर्ती अन्यत्र नाही. १९१२ ला राजभोई पंचमंडळ, १९२२ ला माळ गल्लीतील शिवशक्ती मंडळ, १९२३ ला खालची वेळेस गणेश मंडळाने सुरू केलेले गणेशोत्सव आजही चालू आहेत. दरवर्षी तालुक्यात किमान दिडशेच्या वर सार्वजनिक गणेश मंडळ गणरायाची स्थापना होते . यंदा करोनाचे सावट असल्यामुळे १०१च गणेश मंडळांनी मूर्तीची स्थापना केली. पैकी दहा मंडळांनी सातव्या व दहाव्या दिवशी गणेश विसर्जन केले.
नगर परिषदेने मूर्तीचे विसर्जन व निर्माल्याचे संकलन करण्यासाठी शहरात पाच ठिकाणी व्यवस्था केली होती. तर बाजार समितीचे संचालक संजय फडके यांच्या समर्थ सांस्कृतिक मंडळाने त्यांच्या व्यायामशाळेच्या प्रांगणात शेततळ्यासारखा पांच फूट खोलीचा हौद तयार करुन गणेशमूर्ती विसर्जनाची तसेच निर्माल्यासाठी ट्रॉल्याची व्यवस्था केली होती. तालुक्यात सर्वत्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मिरवणूक न काढता अतिशय साधेपणाने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यंदा करोनामुळे गणेशाचा थाट-माट कुठेही दिसून आला नाही.
शहरातील मानाच्या लाटे गणेशाची आरती नायब तहसिलदार मयुर बेरड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, गुप्तवार्ता विभागाचे राजीव चव्हाण यांच्या हस्ते पेशवेकालीन गणपती वाड्यात करण्यात आल्या नंतर लाटे गणेश मूर्तीचे विसर्जन ढोरा नदीत मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तर राजभोई पंच मंडळ, माळीगल्ली (शिवशक्ती)सार्वजनिक गणेश मंडळ, खालचीवेस ( भगतसिंग)गणेश मंडळ, टिळक मित्र मंडळ, बालाजी तरुण मंडळ , गजराज प्रतिष्ठान, मुंजराज गणेश मंडळ आदी प्रमुख मंडळांनी ढोरा नदीत पोलिस पथकाच्या उपस्थितीत रात्री ८ पर्यंत गणेश विसर्जन केले.
विभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, स .पो . नि . सोपान गोरे, सुजित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात व तालुक्यात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दहादिवस सुरु असलेला गणेशोत्सवाची निर्विघ्नपणे शांततेत सांगता झाली.