रेडा -इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवड हंगाम 2021-22 करिताचे ऊस लागवडीचे धोरण माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी जाहीर केले.
या धोरणानुसार ऊस उत्पादन तंत्राचा अवलंब करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावरती लागवड करून ऊसाचे प्रति एकरी सुमारे 100 टनाहून अधिकचे ऊस उत्पादन घ्यावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
पाटील म्हणाले, उसाची लागवड पूर्ण होताच शेतकऱ्यांनी त्या क्षेत्राची नोंद, त्याच दिवशी शेतकी विभागाकडे देणे बंधनकारक आहे. तसेच जेवढ्या क्षेत्राची लागण पूर्ण झाली आहे. तेवढ्यात क्षेत्राची लागण तारीख ग्राह्य धरली जाईल.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य बेणे निवड, बेणे प्रक्रिया, लागवड पद्धती, रोप लागण पद्धत, रासायनिक खतांच्या मात्रा, ठिबकमधून द्यायवयाची खते, किड व रोगांचे नियंत्रण याप्रमाणे ऊस उत्पादनाचे तंत्र वापरल्यास प्रति एकरी 100 टन किंवा अधिकचे ऊसाचे उत्पादन घेता येईल.
ऊस तोडणीचा कार्यक्रमात ऊस लागवड तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार कोसी 671, व्हीएसआय 434 व एमएस 10001 या लवकर पक्व होणाऱ्या व जादा साखर उतारा असणाऱ्या ऊस जातींची प्राधान्याने तोडणी करण्यात येईल. त्यानंतर को 86032 या ऊस जातीची तोडणी करण्यात येईल. त्यानंतर फुले 265 या ऊस जातीची तोडणी ही लागण तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार केली जाईल.
यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासाहेब घोगरे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जमादार, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड, शेतकी अधिकारी उपस्थित होते.