नेवाशात आढळली नऊ कुपोषित बालके..!

महिला व बालकल्याणचा कारभार चव्हाट्यावर : बालकांना मिळतोय निकृष्ट आहार

नेवासा- नेवासा तालुक्‍यात नऊ कुपोषित बालके आढळून आली आहेत. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यातच तालुक्‍यात पोषण आहारातच युरिया आढळल्याने बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याने पालकांतून संताप व्यक्त होत आहे.

याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का
नेवासा तालुका आर्थिकदृष्ट्या सधन असून, तालुक्‍यात नऊ बालके कुपोषित आढळणे ही लाजिरवाणी बाब आहे. तसेच महिला व बालकल्याण विभागाचा बालकांवर होत असलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित खाते याकडे लक्ष देणार का, असा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते मुकुंद अभंग यांनी उपस्थित केला आहे.

तालुक्‍यात 2017 मध्ये अंगणवाडीतील गरोदर महिला व बालकांना शिरा, उपमा हे निकृष्ट व अळ्यायुक्त आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचे दैनिक प्रभातने उघड केले होते. याबाबत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी मे व जून 2019 या दोन महिन्यांसाठी गरोदर स्तनपान माता व सहा महिने ते तीन वर्षे वयाच्या बालकांसाठी कोरडे धान्य वाटप करण्यात आले होते.

मात्र गव्हामध्ये युरिया तर इतर धान्यात मोठ्या प्रमाणात भेसळ आढळून आल्याने दैनिक प्रभातने वृत्तमालिका प्रसिद्ध केल्याने महिला बालकल्याण विभागाचे पितळ उघडे पडले. तालुक्‍यात दोन प्रकल्प कार्यालये असून, नेवासा कार्यालयात दोन, तर वडाळा कार्यालयात सात कुपोषित बालके असल्याचे सूतोवाच प्रकल्प अधिकाऱ्यांनी केल्याने महिला बालकल्याण विभागाचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. प्रकल्प अधिकारी व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यालयाकडे कुपोषित बालकाविषयी वेगवेगळी माहिती असल्याने नागरिकांचा संभ्रम वाढला आहे.

आरबीएसके अंतर्गत कार्यालयाने सन 2018 चार बालके, तर एक एप्रिल ते 25 मे 2019 या कालावधीत 3 बालके कुपोषित आढळल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तालुक्‍यातील कुपोषित बालकांचे वय जास्त, तर उंची पेक्षा वजन कमी, दंडाचा घेर कमी आढळले आहेत. हे बालके सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील असून, या कुपोषित बालकांना ईडीएनएफ या आहाराची मागणी केली असल्याचे देखील प्रकल्प अधिकाऱ्यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत नेमलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तालुक्‍यातील अंगणवाड्यांत भेटी न देताच कागदोपत्री भेटी दाखवल्याचे बोलले जात आहे.

शासन एकीकडे महिला व बालकल्याण विभागावर महिन्याकाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना देखील तालुक्‍यात कुपोषित बालके आढळणे हा लाजीरवाणा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के यांनी केला असून आम्ही दोन दिवसात नेवासा येथील महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.