जखमी वारकरी महिलेची उपचारासाठी वणवण

नीरेत डॉक्‍टर नाहीत, तर जेजुरी रुग्णालयातून उपचाराविना ससूनला रवानगी

नीरा – नीरा (ता. पुरंदर) जवळ पिंपरे येथे अपघातग्रस्थ वारकरी महिलेला उपचारासाठी शनिवारी (दि. 22) दारोदारी भटकण्याची वेळ आली. नीरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्‍टर नसल्यामुळे तर जेजुरी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टरने उपचार करण्याऐवजी पुण्यातील ससूनचा रस्ता दाखवल्याने या वारकरी महिलेवर उपचारासाठी वणवण भटकण्याची वेळ आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नीरा नजीक पिंपरे येथे एका महिला वारकऱ्यास अज्ञात वाहनाने धडक दिली. पाठीमागून येणाऱ्यांनी या महिलेस नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, या ठिकाणी डॉक्‍टर नसल्यामुळे परिचारिकेने प्राथमिक उपचार केले. डॉक्‍टरांना फोन केला असता त्यांनी फोन घेण्याचे टाळले. यानंतर ग्रामस्थ व पत्रकारांशी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याही संपर्क साधला असता त्यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला व आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. जेजुरी येथे गेल्यावर मात्र, आणखी वाईट अनुभव या जखमी वारकऱ्यांस आला. जबडा फाटल्याने त्याला टाके टाकणे किंवा टीच करणे आवश्‍यक होते. मात्र त्यांनी कोणत्याही तपासणीशिवाय ससूनला जाण्याचा सल्ला दिला. व 101 रुग्णालयामधून ससूनला रवानगी केली. पुरंदर तालुक्‍यात नीरा, वाल्हा, बेलसर या ठिकाणी अद्ययावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर जेजुरी येथे सुसज्य असे ग्रामीण रुग्णालय आहे. सासवड येथे तालुका आरोग्य केंद्र आहे. मात्र, या सर्वच ठिकाणी तातडीच्या रुग्णांवर उपचार न होता त्यांना ससून किंवा खासगी रुग्णालयात पाठवले जाते. यामुळे शासनाच्या वतीने केला जाणारा लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे.

केवळ बड्या बड्या बाता…
जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उद्‌घाटनासाठी व श्रेयासाठी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच ही झाली. पुरंदरमधील नागरिकांची यामध्ये चांगलीच करमणूक झाली. शिवतारे यांनी आता या ठिकाणी रुग्णांवर चांगले उपचार होणार असल्याचे म्हटले होते. तसेच येथे ट्राम सेंटरही उभारणार असल्याचे म्हटले होते. मात्र आहेत त्याच सुविधा येथील नागरिकांना मिळणे कठीण झाले आहे. तर मग अशा बड्या बड्या बातांच करायच्या काय? असा सवाल येथील जनता करीत आहे.

राज्यामध्ये सर्वत्र आरोग्य सेवेबाबत कर्मचारी कमी आहेत. यापूर्वीचे डॉक्‍टर अपघाती मृत झाल्याने तसेच त्यांच्या पत्नीनेही बदली करून घेतल्याने येथे डॉक्‍टरांची कमी आहे. परंतु येत्या 15 दिवसांत या ठिकाणी पूर्णपणे कर्मचारी हजर होतील यासाठी मी प्रयत्नशील आहे.यानंतर येथे पूर्ण क्षमतेने काम सुरू होईल. रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून मी प्रयत्नशील आहे.
– विजय शिवतारे, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री

Leave A Reply

Your email address will not be published.