मिलिटरीचे जवान भेटण्यासाठी आल्याचा कर्नल गायकवाडांचा खुलासा

गुळाणीकरांवर कोणताही दबाव नाही 

राजगुरूनगर – गुळाणी (ता. खेड) येथे जमिनीच्या ताब्यासाठी नव्हे, तर मला भेटण्यासाठी माझ्या युनिटचे जवान आले होते. यामुळे ग्रामस्थांवर कोणताही दबाव नव्हता. उलट ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले, अशी माहिती कर्नल केदार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुळाणी गावात शनिवारी (दि. 22) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास 4 वाहनातून मिलिटरीचे सुमारे 50 ते 60 जवान आले होते. जवान गावात आल्याने येथील दोन शेतकऱ्यांच्या वादामुळे ते आले असल्याची अफवा पसरल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. याबाबत प्रसारमाध्यमातून वृत्त ही प्रसिद्ध झाले; मात्र वास्तविक परिस्थिती तशी नसल्याने रविवारी कर्नल केदार गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेवून स्पष्टीकरण दिले.

केदार गायकवाड म्हणाले की, आमची वडिलोपार्जित जमीन आहे आमच्या सावत्र दोन आत्यांनी माझ्या वडिलांची व आत्यांची परवानगी न घेता एका गुंडाला काही वर्षांपूर्वी जमीन विकली आहे. ही जमीन आमचे वडील कसत आहेत. मात्र, मुळशी येथील सुनील भरणे, दिलीप भरणे यांनी आमच्या कुटुंबाला जमिनीचा ताबा घेत त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्याचे रुपांतर भांडणे आणि हाणामारीत झाले आहे. खोटे खरेदी खत करून आमच्या जमिनीवर ताबा घेण्यासाठी भरणे गावात गुंड पाठवून त्रास देत आहेत. आम्ही वेळोवेळी खेड पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत मात्र, पोलिसांकडून दखल घेतली जात नसून उलट माझ्या कुटुंबावरच गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची शोकांतिका त्यांनी व्यक्‍त केली.

… तर देशाच्या रक्षणासाठी कोणी पुढे येणार नाही
हा प्रसंग माझ्या कुटुंबावर आल्याने मी यात लक्ष घातले आहे. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. देशाचे रक्षण करणाऱ्यांचे घर सुरक्षित नाही तर कुणीही देशाचे रक्षणासाठी पुढे येणार नाही. माझ्या कुटुंबावर असा प्रसंग आल्याने त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. मिलिटरीमध्ये असलेले माझे युनिटचे जवान नाशिक येथे प्रशिक्षणासाठी जात असताना त्यांनी माझ्या गावात येऊन माझी भेट घेतली.

माझ्या गावात आलेल्या जवानांचे आम्ही स्वागत केले. ग्रामस्थांनी देखील त्यांचे स्वागत केले. मात्र, यात कोणालाही धमकावले अगर दहशत माजवली नाही मात्र, काही लोकांनी अफवा पसरविल्याने वृत्तपत्रात अशा आशयाच्या बातम्या आल्याने खेद वाटतो. याप्रकरणात पोलीस यंत्रणा आणि सरकारी यंत्रणा मदत करीत नसल्याने माझ्या कुटुंबावर वाईट प्रसंग आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.