पुणे – के.पी. इलेव्हन क्लब आयोजित कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत होणाऱ्या नाईन-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत सासवड एफसी, केपी इलेव्हन, आयफा, एनडीए युथ क्लब आणि रिअल पुणे युनायटेड या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये रिअल पुणे युनायटेड संघाने रूपाली एफसी संघाचा टायब्रेकमध्ये 6-5 असा पराभव करून विजयी सलामी दिली. सासवड एफसी संघाने ऋषिकेश खेडेकर याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर बीटा संघाचा 2-0 असा पराभव केला.
अल्फ्रेड नागर याच्या तीन गोलांच्या जोरावर केपी इलेव्हन संघाने व्हॅली हंटर्सचा 4-0 असा धुव्वा उडविला. महिपाल बिश्त याच्या दोन गोलांच्या कामगिरीमुळे एनडीए युथ क्लबने ब्ल्यू स्टॅग एफसी संघाचा 2-0 असा सहज पराभव केला. आयफा संघाने पीसीएच लायन्स क्लबचा टायब्रेकमध्ये 6-5 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
वानवडी येथील मथुरावाला फुटबॉल मैदान सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा राज्यमंत्री सुनील केदारी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहर कॉंग्रेस समिती अध्यक्ष रमेश बागवे, ओबीसी उपाध्यक्ष (महाराष्ट्र प्रदेश) साहील केदारी, पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी, संजय कवडे, रवी बागसिंग, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भालेराव यांनी केले.