निमोणे -येथील 47 वर्षीय बाधिताने करोनावर मात करीत घरी परतला आहे, त्यामुळे गाव करोनामुक्त झाला आहे, अशी माहिती निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी इंदिरा डॅनियल, ग्रामसेवक विक्के पोळ व सरपंच बेबीताई भालेकर यांनी सांगितले.
घाटकोपर (मुंबई) परिसरातून दि. 26 मे रोजी 3 जणांचे कुटुंब निमोणे (ता. शिरूर) येथे आल होते. त्यात 47 वर्षीय व्यक्ती पत्नी आणि मुलाचा समावेश होता. निमोणे ग्रामपंचायतीच्या वतीने या तिघांनाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते.
दि. 30 मे रोजी या 47 वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने आरोग्य खात्याने त्यांना पुणे येथे पाठविले होते तिथे तपासणी दरम्यान त्यांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर निमोणे गाव व सभोवतालचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता.
14 दिवस दवाखाना व औषध दुकाने या अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गावातील दुकाने, बॅंका बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील दोघांची करोना चाचणी निगेटिव्ह आली होती.