पुणे – पिंपरी-चिंचवडमधील एका खून प्रकरणी स्थानिक वृत्तवाहिनीवर वादग्रस्त वक्तव्य करणे तसेच व्हॉटसअॅप ग्रुपवर भडकावू मेसेज पाठवल्याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. मयुर मुंडे, आनंद जुनवणे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपुर्वीच एका तरुणाच्या खुनाची घटना घडली होती. एका प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली होती. दरम्यान यासंदर्भात सोशल मीडियातून भडकावू संदेश तसेच संबंधीत मुलीची छायाचित्र फिरत आहेत. यामुळे समाजात तणाव वाढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात सुरुवात केली आहे. संबंधित तरुणीची छायाचित्र सोशल मीडियावर टाकून तणाव निर्माण केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला आहे. तर पुणे शहरात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात नुकताच तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज जगताप खून प्रकरणी फेसबुकच्या साईटवरील वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर खुनप्रकरणी धार्मिक रंग मुद्दामुन चढवला जात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मयुर मुंडे याने वादग्रस्त वक्तव्य नोंदवले होते. तसेच औंध शिवाजीनगर न्यूज या व्हॉटसअॅप ग्रुपवर आनंद जुनवणे याने पोस्ट केलेल्या ऑडिओ संदेशामध्ये भडकावू अशी भाषा वापरली होती. आरोपींनी सामाजिक भावना दुखावून, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.