Nilesh Lanke | Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम आजही कायम राहिला. निलेश लंके लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार गटात जात असावेत, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.
त्याप्रमाणे निलेश लंके आज पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी शरद पवार गटाचे अनेक बडे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना निलेश लंके म्हणाले की, “आपण शरद पवार यांच्या विचारधारेवरच चालतो, मी शरद पवारांच्या नावाने कोविड सेंटर चालवले, मी शरद पवारांचे नेतृत्व कधीच सोडलेले नाही.
खासदारकीच्या निवडणुकीबाबत शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मी पुस्तक प्रकाशनासाठी इथे आलेलो आहे’. असं निलेश लंके यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “अजित पवार नक्की काय बोलले याची मी माहिती घेईन. मी लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी लहान कार्यकर्ता असून, पवार साहेबांच्या विचारधारेला सोडून जाणं एवढ सोपे नाही.
पण आपण अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देवून शरद पवार गटात प्रवेश करतोय, असं निलेश लंके यावेळी म्हणाले नाहीत. त्यामुळे त्यांनी सस्पेंस कायम ठेवला आहे.
दरम्यान, निलेश लंके यांना अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवायची आहे. मात्र अजित पवार ज्या महायुतीत आहेत, त्यामध्ये नगरची जागा भाजपकडे गेली आहे, त्याठिकाणी भाजपने सुजय विखे यांना पुन्हा तिकीट दिलं आहे.