निफ्टी, सेंसेक्‍स विक्रमी पातळीवर; ‘रिलायन्स’कडून तेजीचे नेतृत्व

बॅंकीग आणि पायाभूत क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी

मुंबई – रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण शुक्रवारी जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात बॅंकींग, वित्त आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाली.

त्यामुळेच शेअर बाजाराचे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर विराजमान झाले आहेत. रुपयाचा दर आज वाढल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. आजच्या कामकाजाचे वैशिष्टय म्हणजे मुख्य निर्देशांकापेक्षा मिड कॅप आणि स्मॉल कॅप जास्त प्रमाणात वाढले.

बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी0.73 टक्‍क्‍यांनी म्हणजे 114 अंकांनी उसळून 15,690 पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 382 अंकांनी वाढून 52,232 वर बंद झाला. या अगोदर 15 फेब्रुवारी रोजी हा निर्देशांक 52,154 अंकावर बंद झाला होता.

करोना रोगावरील लसीकरण वेगात होणार आहे. रिझर्व्ह बॅंक उदार पतधोरण जाहीर करण्याची शक्‍यता आहे. या कारणामुळे शेअर बाजारात खरेदीचे वारे चालू आहेत. त्याचबरोबर चौथ्या तिमाहीचे ताळेबंद सकारात्मक जाहीर झाले आहेत. त्यामुळे छोट्या कंपन्यांचे भविष्य दीर्घ पल्ल्यात चांगले असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅप मधील कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी होत आहे.

त्याचबरोबर निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या शेअरचे भाव महाग आहेत. आज खरेदी व्यापक प्रमाणात झाली. त्यामुळे ग्राहक वस्तू, रिऍल्टी, भांडवली वस्तू, बॅंकींग, तेल आणि नैसर्गिक वायू यासह सर्व क्षेत्राचे निर्देशांक वाढले. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये 1.04 टक्‍क्‍पर्यंत वाढ झाली. जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले.

आतापर्यंत कमी-अधिक प्रमाणात परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे वातावरण होते. मात्र आता परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतामध्ये खरेदी करू लागले आहेत. कारण भारतातील करोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. काल या गुंतवणूकदारांनी 921 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची आकडेवारी समोर आली आहे

रिलायन्स कंपनीकडून तेजीचे नेतृत्व

गेल्या सात दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरच्या भावात एकतर्फी वाढ होत आहे. त्यामुळे या कंपनीचे बाजारमूल्य आता 14 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.
काल व परवा मुख्य निर्देशांक फारसे वाढले नाहीत. तरी रिलायन्स कंपनीच्या शेअरच्या भावात मात्र वाढ झाली होती.

या सात दिवसात रिलायन्स कंपनीच्या शेअरचा भाव 12.45 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी कंपनीने देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी केली आहे. त्यामुळे आता कंपनीला विस्तारीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असल्याचे कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.