कोईम्बतूर – तामिळनाडूमध्ये माओवाद्यांच्या कथित समर्थकांवर राष्ट्रीय तपास संस्थेने आज छापे टाकले. कोईम्बतूर आणि पोलाचीच्या आजूबाजूच्या परिसरात हे छापे घालण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
“एनआयए’च्या पथकाने दिनेश नावाच्या एका दंत वैद्याच्या घरावर छापा घातला. डॉक्टर दिनेशला माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून केरळच्या दहशतवाद विरोधी पथकाने फेब्रुवारी महिन्यातच अटक केली आहे. तेंव्हापासून तो तुरुंगातच आहे.
याच आरोपात अटक करण्यात आलेल्या दानिश याच्या घरावरही “एनआयए’ने छापे घातले. दानिशवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली अन्य काही गुन्हे दाखल आहेत. दानिश देखील केरळमधील तुरुंगात आहे.
माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेला आणि गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या संतोष याच्या अंगालकुरुची येथील घरावरही छापा घालण्यात आला. तामिळनाडूतील थानी या अन्य एका ठिकाणीही “एनआयए’ने छापा घातला.