नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “‘एनआयएने आज बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश आणि ओडिशामध्ये अनेक ठिकाणी एकाचवेळी छापे घातले. नक्षलवाद्यांच्या अर्थसहाय्याच्या तपासाच्या संबंधित हे छापे घालण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिहारमध्ये “एसटीएफ’ आणि “सीआरपीएफ’ बरोबर मिळून एकूण 26 ठिकाणी छापे घालण्यात आले. यामध्ये जेहानाबाद, पाटणा ग्रामीण, अरवाल, नालंदा, गया, नवाडा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील संशयित आणि आरोपींच्या ठिकाणांवर हे छापे घालण्यात आले आहेत. झारखंडमधील कोडेरमा, ओडिशामधील भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील नेल्लोरमध्येही छापे घालण्यात आले.
माओवादी कम्युनिस्ट पार्टीकडून दहशतवादी कारवायांसाठी आणि बिहारमधील मगध भागातील भूमिगत कार्यकर्त्यांसाठी केल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याशी संबंधित हे प्रकरण आहे, असे “एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नक्षलवादी कारवायांबरोबरच शस्त्रे, दारुगोळा आणि अन्य नक्षलवाद्यांच्या नियुक्त्यांसाठी हा पैसा उभा केला जात असल्याच्या आरोपातून हे छापे घालण्यात आले होते.
या छाप्यांदरम्यान 3 देशी पिस्तुले, एक 315 बोअर रायफल, 59 जिवंत काडतुसे, काही डिजीटल उपकरणे, नक्षलवादी चळवळीचे साहित्य, गुन्हेगारी साहित्य आणि 4 किलो संशयित अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणाशी संबंधित अधिक तपास सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.