पणजी – गोव्यात तृणमूल कॉंग्रेससाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या आय-पॅक या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संस्थेच्या आवारात पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान, पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोरवोरिम शहरातून त्याला अटक करण्यात आली.
आरोपीकडून गांजा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोवा पोलिसांनी शुक्रवारी पोरवोरिममधील अनेक बंगल्यांवर छापेमारी केली. येथे 8 बंगले या संस्थेने भाड्यावर घेतले आहेत. या छाप्यात आय-पॅकच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे वय 28 वर्ष आहे.
गोव्यात 14 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तृणमूल कॉंग्रेससाठी रणनीती आखणारे प्रशांत किशोर गोव्यात पक्षाचे काम सांभाळत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर आणि तृणमूल कॉंग्रेसमधील संबंध बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. प्रशांत किशोर यांचे कोणत्याही पक्षाशी संबंध बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही.
अलिकडेच ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी दावा केला होता की, त्यांच्या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन वन मॅन वन पोस्ट संदर्भात काही पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या.
याबाबत त्यांच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. टीएमसीने गेल्या वर्षी जूनमध्ये वन मॅन वन पोस्ट उपक्रम सुरू केला होता. तेव्हा या कंपनीनेही त्याला मान्यता दिली आणि अनेक तरुण कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही समर्थन दिले होतं. पण नंतर कोलकातामधील स्थानिक निवडणुकीसाठी फरहाद हकीम यांना तिकीट देण्यात आले, तेव्हा ममता बॅनर्जी यांनी समर्थन दिले. त्यामुळे वन मॅन वन पोस्टच्या दाव्यांबाबत पक्षांतर्गत प्रश्न निर्माण झाले होते.