पुणे – डावी भुसारी कॉलनीतील लोहिया आयटी जैन पार्ककडून वारजेकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर डांबरीकरण करून रस्ता चकाचक करण्यात आला. मात्र, नेहमीप्रमाणे महापालिकेने कोणतीही माहिती अथवा कल्पना न देताच चकाचक केलेला रस्ता लगेच खोदला. याबाबत एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता, “आम्ही रस्ता तयार करून देतो,’ असे सांगून वेळ मारून नेली. चांदणी चौकात रस्तारूंदीकरण आणि नवीन उड्डाणपुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. काम सुरू करण्यापूर्वी तसेच रस्ते, उड्डाणपुलाचे फायनल काम (डांबरीकर, पदपथ) करण्याअधी एनएचएआयने महापालिकेला वेळोवेळी आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत. त्यावेळी काही काम नाही, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर मात्र चकाचक केलेला रस्ता पालिकेने खोदल्याने शासकीय कारभाराचा नमुना उघड झाला आहे.
पॅच मारणार की…
गुरूवारी (दि. 11) सकाळी नव्या कोऱ्या रस्त्यावर “अब हमाराही राज है’ अशा पद्धतीने जेसीबीने खोदकाम सुरू होते. एनएचएआय विभागातील अधिकाऱ्यांना हा प्रकार समजाताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून याबाबत जाब विचारला असता महापालिका अधिकाऱ्यांनी “अत्यावश्यक’ कारण पुढे करीत रस्ता पुन्हा करून देतो, असे सांगितले. आता, रस्ता पहिल्यासारखा करणार की पॅच मारणार हे प्रत्यक्ष काम झाल्यावरच समजेल.
महापालिकेकडून बाणेर-बालेवाडी पाणी योजना 17 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी चांदणी चौक परिसरात झिरो ग्रॅविटी व्हॉल्व बसविणे अत्यावश्यक होते, अन्यथा ही योजना सुरू होणार नाही म्हणून रस्ता खोदण्यात आला. उद्या (शुक्रवारी) दुपारी काम संपताच तो तातडीने दुरूस्त करून दिला जाईल. याबाबत महामार्ग प्राधिकरणासही कल्पना देण्यात आली आहे. त्यानुसार रस्त्याचे काम करून दिले जाईल.
– अनिरुद्ध पावसकर,पाणीपुरवठा विभागप्रमुख, मनपा