जुन्नर -लॉकडाऊनमध्ये जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जीव धोक्यात घालून तालुक्यासह मुंबईच्या नागरिकांना भाजीपाला आणि धान्य पुरविले आहे. ते खऱ्या अर्थाने कोविड योद्धे आहेत. राज्यशासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत करीत आहे, असे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले.
जुन्नर पंचायत समितीमध्ये कृषीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बेनके बोलत होते. यावेळी सभापती विशाल तांबे, सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, कृषी अधिकारी प्रल्हाद शिरसाट, प्रवक्ते भाऊ देवाडे, नगरसेवक भाऊ कुंभार, अधिकारी, परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
बेनके म्हणाले की, वादळी पावसात नुकसान झालेल्या सर्व घरांचे व मालमत्तेचे पंचनामे झाले असून लवकरच याची भरपाई देण्यात येणार आहे. यंदा कुकडी प्रकल्पाचे नियोजन उत्तमरीत्या झाले असून शेतकऱ्यांनी पाण्याबाबत अजिबात काळजी करू नये, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच लेण्याद्रीचे कोविड केअर जिल्ह्यात सर्वोत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ नारायणगावच्या वतीने 150 पीपीई किट आणि 500 हॅन्डग्लोव्हज लेण्याद्री कोविड केअर सेंटरला देण्यात आले. पुणे रोटरीच्या फार इस्ट क्लबने तालुक्यातील 68 कुपोषित बालकांना पौष्टीक खाद्याचे वाटप केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, लेण्याद्री सेंटरचे प्रमुख डॉ. शाम बनकर, पृथ्वीराज गुरव, संतोष आटोळे बालविकास अधिकारी रवींद्र तळपे, हरिभाऊ हाके उपस्थित होते.