राजगुरूनगर (प्रतिनिधी) : राजगुरूनगर नगर परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभापती संपदा सांडभोर यांनी करोना विषाणूची महामारी दूर करण्यासाठी समाजाची काळजी घेणाऱ्या पोलीस, नगरपरिषद, महसूल व पत्रकार यांच्यासह सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना कापडी मास्क शिवून त्याचे मोफत वितरण केले आहे त्यांच्या या उपक्रमाचे पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी कौतुक केले.
राजगुरूनगर शहरात सध्या लॉकडाऊन आहे त्यातच नगर परिषदेच्या आवाहनानंतर व्यापारी वर्गाने स्वतःहून दुकाने बंद ठेवल्याने गेली सहा दिवस शहर पूर्णतः बंद आहे. या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, नगर परिषदेचे कर्मचारी महसूल व आरोग्य कर्मचारी, पत्रकार करोना विषाणूरोखण्याबाबत महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना मास्कची आवश्यकता आहे दुकानात मिळतातच परंतु त्याला पैसे लागतात व ते घेण्यासाठी वेळ नाही. समाजातील या घटकांची गरज ओळखून नगरपरिषेदच्या आरोग्य समितीच्या सभापती संपदा सांडभोर यांनी स्वतः मास्क बनवून ते वरील घटकातील व्यक्तींना मोफत वाटप केले.
प्राथमिक स्वरूपात पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पेसह पोलीस कर्मचाऱ्यांना, जैन धर्मार्थ दवाखान्यातील डॉक्टर नर्सेस याना मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, मुख्याधिकारी मछिंद्र घोलप, नगरसेविका रेखा क्षोत्रीय, सारिका घुमटकर, विजय भन्साळी, संतोष बोथरा आदी उपस्थित होते.
करोना विषाणूची महामारी दूर करण्यासाठी मास्कचा सर्वानी उपयोग करावा आणि समाजात जनतेची काळजी घेणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना त्याची गरज आहे म्हणून स्वतः मास्क तयार करून ते शासकीय यंत्रणेतील अधिकारी कमर्चारी, डॉक्टर, नर्सेस, यांना मोफत वाटप केले जात असल्याचे संपदा सांडभोर यांनी सांगितले.