पिंपरी(प्रतिनिधी) – डोक्यात गोळी लागून भाजप नगरसेविकेचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री चिंचवडेनगर चिंचवड येथे घडली.
प्रसन्ना शेखर चिंचवडे (वय 21, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा मुलगा आहे. रविवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास जेवण झाल्यावर तो आपल्या खोलीत गेला. त्यानंतर पिस्तुलातून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्याच्या घरच्यांनी प्रसन्ना याच्या खोलीकडे धाव घेतली असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यास उपचारासाठी त्वरित थेरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.
शेखर चिंचवडे यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. याच पिस्तुलातून गोळी सुटून हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. याबाबत अधिक तपास सुरू आहे.