बाजारात 7 हजार 300 क्विंटल शेतीमालाची आवक ; बहुतांश भाज्यांचे भाव स्थिर
पुणे – करोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पूर्व भाग महापालिकेने सील केला आहे. तरी या भागात असणारे मार्केट यार्ड अत्यावश्यक सेवा म्हणून सुरूच आहे. मंगळवारी 352 वाहनांतून 7 हजार 300 क्विंट्ल शेतीमालाची आवक झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.
गर्दी होऊ नये, यासाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड रोटेशननुसार चालविण्यात येत आहे. मंगळवारी (दि.7 ) भाजीपाला बाजार सुरू होता. बाजारात आलेल्या सर्व शेतीमालाची विक्री झाली असून, सर्व फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. सोशल डिटेन्स पाळून बाजार चालविला जात असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
दरम्यान मोशी उपबाजारात 115 वाहनांमधून 2 हजार 300 क्विंटल शेतीमालाची आवक झाली असून, गर्दी होत असल्याने मांजरी उपबाजार बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.