रेडा – मी जरी राज्याचा मंत्री असलो तरी देखील इंदापूर तालुका मला प्राणाहून प्रिय आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी मी खर्च करीत असतो. त्यामुळे सामान्य व गरीब माणूस माझी ऊर्जा आहे. तालुक्यातील विरोधकांनी उगीच माझ्या वाटेत खिळे, काचा टाकून काही फायदा होणार नाही. त्यापलीकडे मी पोहोचलो आहे, अशी टीका बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक पिंपरी (ता. इंदापूर) येथील बॅंकेचा स्थलांतर समारंभ भरणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन रमेश थोरात होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पिंपरीच्या सरपंच ज्योती बोडके, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन सुदर्शन बोडके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, युवक नेते अभिजीत रणवरे, रणजीत घोगरे, सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष हामा पाटील, ज्येष्ठ नेते कालिदास देवकर, डी. एन. जगताप, विजय शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण, इंदापूर तालुक्याचे विभागीय अधिकारी आनंद थोरात, शाखाधिकारी दिलीप गोसावी, विकास अधिकारी एन. जी. माने, अमोल जगदाळे, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे माझ्या रक्तात गोरगरीब सामान्य उपेक्षित शेतकरी यांना न्याय देण्याची व काम करण्याची पद्धत आहे. तरी देखील काही विरोधी मंडळी मला नाहक त्रास देण्याचा घाट घालतात. किमान चांगले काम करणाऱ्याला शब्बासकी नाही देता आली तरी त्रास देऊ नका, असा टोला त्यांनी लगावला. हा गुण येथील विरोधकांमध्ये दिसत नाही. किती जरी मी चाललेल्या वाटेवर खिळे टाकले, काचा टाकल्या तरी देखील त्यावरून जाण्याची ऊर्जा माझ्यात निर्माण झालेली आहे. माझ्याकडे मोठ्या पुढाऱ्यांची संख्या नाही. पण सामान्य जनता माझ्या पाठीशी खंबीर आहे. त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
भरणे म्हणाले की, काही जण स्वतःला सहकार तज्ज्ञ म्हणून मिरवतात. मात्र, सहकाराचे जाणकार तुम्ही असाल तर खासगी प्रॉपर्टी म्हणून सहकारी तत्त्वावर चालणारे साखर कारखाने वापरता कशासाठी. नीरा- भीमा सहकारी साखर कारखाना व इंदापूर कारखाना तुमचा प्रायव्हेट कारखाना नाही. सहकारी आहे, याची जाणीव ठेवा. 1996 मध्ये लोकनेते (स्व) बोडके दादा यांच्यामुळे माझा सहकार क्षेत्रात राजकारणात पाया रोवला गेला. मला अशा थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभल्यामुळे मी कधीही जवळचा लांबचा आमचा असा भेदभाव न करता ज्याला गरज आहे, त्याचे काम करतो. श्रीकांत बोडके यांनी प्रास्ताविक केले. सुदर्शन बोडके यांनी आभार मानले.
जिल्हा बॅंकेकडून एटीएम सेवा पिंपरीमध्ये मिळणार
बॅंकेचे चेअरमन रमेश थोरात म्हणाले की, लोकनेते महादेवराव बोडके हे व्यक्तिमत्व इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीत महत्त्वाचे आहे. त्यांचा सहवास आम्हाला कायम लाभला. राज्यमंत्री भरणे यांचे चुलते भरणे भाऊ यांनी आम्हाला जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळात येण्यासाठी मोलाची मदत केली. हे आम्ही कदापि विसरणार नाही. जिल्हा बॅंकेचा चेअरमन म्हणून इंदापुरातील शेतकऱ्यांना कायम सुविधा देण्यासाठी अहोरात्र कटिबद्ध आहोत. पिंपरी भागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बॅंकेचे एटीएम सेवा तात्काळ उपलब्ध करुन दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.