इंदापूर – शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना यांच्याकडून गव्हाणीत उसाची मोळी टाकण्याअगोदरच चालू सन 2023-24 च्या गळीत हंगामामध्ये गळीत होणाऱ्या ऊसापोटी बिलाचा पहिला हप्ता 2500 रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे. ही माहिती कारखान्याने जाहीर केली आहे.
इंदापूर तालुक्यातील महात्मा फुले नगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याकडून आगामी गळीत हंगाम ऊस बिलाचा पहिला हप्ता 2500 रुपये प्रमाणे दिला जाईल, त्यानंतरचे ऊस बिलाचे पुढील हप्ते इतर कारखान्यांप्रमाणे दिले जातील. तसेच कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना आगामी गळीत हंगामात ऊस दरात आघाडीवर राहील, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.30) दिली.
कर्मयोगी कारखाना चालू गळीत हंगामामध्ये कितीही अडचणी आल्या तरी 9 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे पूर्ण करेल. त्या दृष्टीने संचालक मंडळाने नियोजन केले असून, कारखान्याची सर्व यंत्रणा पुर्णपणे सज्ज झाली आहे. कारखाना आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असून गळीत झालेल्या ऊसाची तसेच तोडणी व वाहतूकीची सर्व बीले वेळेवर व काटेकोरपणे हंगाम संपेपर्यंत दिली जातील. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला नियमितपणे होत असून दिवाळीसाठी एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
तर निरा भिमा कारखाना चालू होणाऱ्या गळीत हंगामात इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देणार आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चालू गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे पुर्ण केले जाईल, त्यादृष्टीने संचालक मंडळाने नियोजन केले आहे. कारखान्याची सर्व यंत्रणा पुर्णपणे सज्ज झाली असून, कारखाना आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत आहे. चालू गळीत हंगामामध्ये गाळप होणाऱ्या ऊसाची सर्व बिले, वाहतूक कंत्राटदारांची बिले ही नियमितपणे देण्याचे सर्व नियोजन कारखान्याने केलेले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार हे प्रत्येक महिन्याला नियमित होत असून, दिवाळीसाठी एक महिन्याचा बोनस जाहीर करण्यात आला आहे, असे लालासाहेब पवार यांनी सांगितले.