“रामाच्या नावाचा राजकीय वापर कधी तरी थांबायलाच हवा’

मुंबई – विश्‍व हिंदु परिषदेतर्फे अयोध्येतील राम मंदिरासाठी चार लाख कार्यकर्त्यांची फौज नेमून लोकांकडून वर्गणी गोळा केली जाणार आहे, त्यासाठी या कार्यकर्त्यांकरवी एक संपर्क अभियानही राबवले जाणार आहे. या उप्रकमावर शिवसेनेने जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

ही राम मंदिर उभारणीसाठीची तयारी नसून सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे. रामाच्या नावाने राजकीय पोळ्या भाजून घेण्याचा हा प्रकार भाजपकडून सातत्याने होत असून रामाच्या नावाचा राजकारणातील वापर कधी तरी थांबायलाच हवा आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे.लोकवर्गणीतून मंदिर बांधायचे असे कधीच ठरले नव्हते, लोकवर्गणीचा विषय हा राजकीय स्वरूपाचा आहे असा आक्षेपही शिवसेनेने घेतला आहे.

पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की, अयोध्येतील मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्याचे काम चार लाख कार्यकर्ते मकरसंक्रातीपासून सुरू करणार आहेत.हे चार लाख स्वयंसेवक बारा कोटी कुटुंबांशी संपर्क साधतील असे विश्‍व हिंदु परिषदेचे नेते चंपतराय यांनी घोषित केले आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी अशी लोकवर्गणी जमा करण्याची गरजच काय असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. अनेकांनी त्यासाठी देणग्या दिल्या आहेत.

शिवसेनेनेही एक कोटी रूपये या आधीच दिले आहेत. या निधीत तीनशे कोटी रूपये सहज जमले असतील. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनीही मंदिराच्या उभारणीसाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. असे असताना वर्गणी जमा करण्याच्या नावाखाली लोकसंपर्क मोहीम राबवणे याचा उद्देश सन 2014 च्या निवडणुकीसाठी पूर्व तयारी करणे हाच असावा अशी शंकाही या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.

रामाच्या नावाने राजकीय पोळ्या भाजून घेण्याचा हा प्रकार कधीना कधी बंद व्हायला हवा असेही शिवसेनेने म्हटले आहे. नेमले जाणारे स्वयंसेवक नेक्‍की कोण आहेत, ते कोणी नेमले असे प्रश्‍नही शिवसेनेने उपस्थित केले आहेत. या स्वयंसेवकांची पालक संघटना नेमकी कोण आहे हे स्पष्ट झाले तर बरे होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.