राहुल गांधी ते ममता बॅनर्जी – सामनातून विरोधकांच्या चुकांवर शिवसेनेचे बोट

मुंबई – कॉंग्रेस हा पक्ष राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पक्ष असला तरी सध्या तो गलितगात्र आणि विस्कळीत झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व विरोधी पक्षांनी युपीएच्या बॅनरखाली एकत्र येऊन मोदी व भाजपला समर्थ पर्याय देण्याची वेळ आता आली आहे असे शिवसेनेने म्हटले आहे. पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात ही सूचना करण्यात आली आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष चालवले आहे. विरोधक अकार्यक्षम व प्रभावहिन ठरत आहेत. त्यामुळेच सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करू शकते आहे. या संबंधात केंद्र सरकारला दोष देण्यापेक्षा विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करून नेतृत्वाच्या संबंधात पर्याय दिला पाहिजे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी  मोदी सरकारला जोरदार लढत देत आहेत.

पण त्यांच्यात काही तरी अभाव जाणवत आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएची सध्याची स्थिती एखाद्या स्वयंसेवी संघटनेसारखी झाली आहे. युपीएतील घटक पक्षांनीही शेतकऱ्यांचे हे आंदोलन गांभीर्याने घेतलेले नाही. युपीएचे हे घटक पक्ष नेमके करतात तरी काय हेही अजून स्पष्ट होताना दिसत नाही. शरद पवार हे व्यक्तिगत स्वरूपात राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेले एकमेव नेते आहेत.

ममता बॅनर्जी पश्‍चिम बंगाल मध्ये एकाकी लढत देत आहेत. या अवघड क्षणी देशातील सर्व राजकीय पक्षांनी ममतांच्या बाजुने आपली ताकद लावली पाहिजे. ममतांनी आत्तापर्यंत फक्त पवारांशी संपर्क साधला, त्यानुसार पवार बंगालला जात आहेत. पण हे काम कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली व्हायला हवे आहे असे त्यांनी म्हटले आहे.

तृणमुल कॉंग्रेस, शिवसेना,अकालीदल, बहुजन समाज पक्ष, अखिलेश यादव, जगन्नाथ रेड्डींची वायएसआर कॉंग्रेस, तेलंगणा राष्ट्रीय समिती, ओडिशातील नवीन पटनाईक यांचे पक्ष, कर्नाटकातील एच.डी.देवेगौडा यांचा पक्ष, हे सर्व पक्ष आज भाजपच्या विरोधात आहेत. पण ते युपीएचे घटक पक्ष नाहीत.हे सर्व पक्ष जो पर्यंत युपीए आघाडीत एकत्र येत नाहीत तो पर्यंत भाजप सरकारला समर्थ पर्याय उभारता येणार नाही असेही शिवसेनेने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.