नवी दिल्ली – करोना व्हायरसची परिस्थिती भारताने उत्तमरित्या हाताळली असली तरी जागतिक क्रमवारीत भारत पाचव्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर गेला आहे. भारताने आगामी काळात अर्थव्यवस्था वाढविण्यासाठी योग्य उपाययोजना केल्यास भारत पुन्हा पाचव्या स्थानावर 2025 मध्ये जाऊ शकतो. तर 2030 मध्ये तिसऱ्या स्थानावर जाऊ शकतो. ही माहीती एका अभ्यास अहवालात देण्यात आली आहे.
2019 मध्ये भारताने ब्रिटनला मागे टाकून जागतिक अर्थव्यवस्थेत पाचवे स्थान पटकावले होते. मात्र 2020 मध्ये भारत पुन्हा सहाव्या क्रमांकावर गेला आहे. सेंटर फोर इकॉनॉमिक अँड बिझनेस रिसर्च या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारताचा विकासदर चालू वर्षात खालावणार असला तरी 2021 मध्ये भारताचा विकासदर नऊ टक्के व 2022 मध्ये सात टक्के होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था विकसित होण्याच्या जवळ जाणार असल्यामुळे 2035 पर्यंत भारताचा विकास दर कमी होत 5.8 टक्के होईल. दरम्यानच्या काळात 2030 मध्ये भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होईल. भारत ब्रिटनला 2025 मध्ये, जर्मनीला 2027 मध्ये, जपानला 2030 मध्ये मागे टाकेल.
याअगोदर व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार 2033 मध्ये अमेरिकेला चीनला मागे टाकून जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणे अपेक्षित होते. मात्र दरम्यानच्या काळात अमेरिकेची परिस्थिती फारच बिघडली आहे. त्यामुळे अमेरिकेची क्रमांक एकची जागा चीन 2028 मध्ये घेईल.
करोना व्हायरसच्या प्रभावाअगोदरच भारतीय अर्थव्यवस्था घसरणीच्या वाटेवर होती. 2019 मध्ये भारताचा विकासदर केवळ 4.2 टक्के इतका मोजला गेला होता.
2016 मध्ये विकास दर 8.3 टक्के इतका होता. दरम्यानच्या काळात करोनामुळे भारतीय अर्थव्यस्थेवर जास्त परिणाम झाला आहे. हा परिणाम कमी करण्यासाठी भारत सरकार आणि रिझर्व्ह बॅंक प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे तिसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर सकारात्मक होण्याची शक्यता आहे. भारताचा विकास दर पहिल्या तिमाहीत उणे 23.9 टक्के तर दुसऱ्या तिमाहीत उणे 7.5 टक्के इतका मोजला गेला आहे.
………