किव्ह – युक्रेनच्या अतिपूर्वेकडील भागावर रशियाने आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत, असा आरोप युक्रेनने केला आहे. अतिपूर्वेकडील औद्योगिक प्रकल्प ताब्यात घेण्यासाठी रशियाच्या फौजांनी आता पूर्ण ताकदीनिशी जमिनीवरील चढाई सुरू केली आहे. युद्धाच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये डोनबास भागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रशियाचे सैन्य करत आहे. संपूर्ण आघाडीवरच रशियाच्या फौजांनी जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे युक्रेनच्या जनरल स्टाफने म्हटले आहे.
डोनबासच्या दिशेने रशियाचे सैन्य 300 मैलांवर येऊन ठेपले आहे. दोनेस्क आणि लुहान्सक सारख्या काही भागांवर ताबा मिळवण्याचा रशियाच्या सैन्याचा आटापिटा सुरू आहे. त्यासाठी शेजारील खारकिव्हमधून काही आघाड्या उघडण्यात आल्या आहेत. रशियाच्या सैन्याने केलेली मारिऊपोलची कोंडी अजूनही कायम आहे. त्याशिवाय अन्य काही महत्वाच्या शहरांवरही रशियाकडून क्षेपणास्त्रांचा मारा केला जाऊ लागला आहे.
डोनबासच्या काही भागांमध्ये रशियाचे समर्थन असलेले बंडखोर गेल्या 8 वर्षांपासून युक्रेनच्याविरोधात लढत आहेत. त्यांचे पाठबळ आता रशियाच्या सैन्याला मिळाले आहे. या बंडखोरांच्या विरोधात युक्रेनच्या सैन्याकडूनही जोरदार आक्रमक चढाई केली जाऊ लागली असल्याचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी काल रात्रीच्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटले होते.