पिंपरी – आपल्या मुलींनी उच्च शिक्षण घेऊन एक नामांकित डॉक्टर व्हावे, या भावनेने मुलींना युक्रेनमध्ये शिक्षणासाठी पाठविले, परंतु रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धाने आई-वडिलांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. मावळ तालुक्यातील प्रदीप गुप्ता यांची कन्या महक गुप्ता आणि मारुती दाभाडे यांची कन्या मोनिका या युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. या मुली ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणीच हल्ला झाला आहे. सकाळी या मुलींबरोबर कुटुंबीयांचा संपर्क झाला परंतु त्यानंतर संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतातुर झाले आहेत.
मारुती दाभाडे हे टॅक्सी चालक आहेत. परंतु आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावे. पुढे जाऊन मोठे बनावे हे सुप्न उराशी बाळगून त्यांनी आपल्या मुलीला शिक्षण घेण्यासाठी परदेशी पाठविले. परंतु अचानक रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने आपली मुलगी सुखरूप मायदेशी कधी येईल अशी आशा कुटुंबातील नागरिकांना आहे.
हल्ला झाला ते ठिकाण या मुली शिक्षण घेतात त्याच शहरात आहेत. हल्ला झाल्यानंतर घरातील माणसांची हृदय आपल्या मुलींच्या काळजीने पिळवटून निघाली. मुलींविषयी चिंता वाटू लागली. सकाळी मुलींना फोन केला तेव्हा त्या व्यवस्थित बोलल्या. आम्ही सुरक्षित आहोत असेही त्यांनी सांगितले, तसेच लवकरच आम्ही मायदेशी परत येऊ असा विश्वास घरच्यांना दिला. परंतु नंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशी भावना कुटुंबीयांना दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केली.
युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांच्या कुटुंबीयांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले की, रशियाने युक्रेनवरती हल्ला करत बहुतांश विमानतळे नेस्तानाभूत केल्याची वृत्ते येत आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या मायदेशी येणे कठीण झाले आहे. त्यामुळे शिकण्यासाठी गेलेली आपली लेकरे सुरक्षित तर राहतील ना असा प्रश्न कुटुंबांना पडला आहे.