पिंपरी – स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर सांगवी पोलिसांनी कारवाई केली. कृष्णा चौकाजवळ, नवी सांगवी येथे ही कारवाई गुरुवारी (दि. 24) सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली. यात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत दोन महिलांची सुटका केली आहे.
स्पा सेंटर मालक दिगंबर प्रल्हाद कदम (वय 25, रा. कृष्णा चौकाजवळ, नवी सांगवी), मॅनेजर समाधान पंढरीनाथ पाटील (वय 26, रा. नवी सांगवी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रवीण पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कृष्णा चौकाजवळ, नवी सांगवी येथे एका फ्लॅटमध्ये गोल्ड हेल्थ स्पा नावाने स्पा सेंटर सुरू केले. तेथे आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला. याबाबत माहिती मिळाली असता सांगवी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा मारून कारवाई केली.
दोन महिलांची सुटका करून स्पा सेंटर मालक आणि मॅनेजर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये 16 हजार 830 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे तपास करीत आहेत.