पुणे – “एसएसपीएमएस’ महाविद्यालयासमोर सुरू असलेल्या मेट्रो स्थानकाच्या डक्टसाठी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तीन मुख्य जलवाहिन्या फुटल्या. त्यामुळे पुणे विद्यापीठ ते कॅन्टोन्मेंटपर्यंत दोन्ही बाजूंचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे जवळपास दोन ते अडीच लाख पुणेकरांना पाणीबाणी सहन करावी लागणार आहे.
या घटनेनंतर महापालिकेने दुरूस्तीचे काम हाती घेतले असले, तरी त्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहाटे दोनच्या सुमारास ही लाइन फुटल्याचे समजताच महापालिकेने पाण्याचा मुख्य वॉल्व्ह बंद केला. मात्र, त्यानंतरही लाइनमध्ये असलेले लाखो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान, गुरुवारी दिवसभर दुरुस्तीमुळे लाइनवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
“एसएसपीएमएस’ महाविद्यालयासमोर मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. तेथील एन्ट्री आणि एक्झिटसाठी शाळेच्या मैदानाबाजूला खोदाई करण्यात आली आहे. तेथूनच ही जलवाहिनी गेलेली आहे. मेट्रोने चारही बाजूंना सिमेंटची भिंत उभारली असून भिंत आणि जमिनीमधली मोकळी पोकळी भरण्यासाठी माती टाकण्यात आली. तसेच त्यावर भार देण्यात आला. या कामाचा दाब जलवाहिनीवर आला. त्यामुळे लष्कर जलकेंद्रातून विद्यापीठ रस्ता परिसर आणि मंगळवारपेठेच्या काही भागांस पाणी पुरवठा करणारी ही 14 इंच व्यासाची वाहिनी फुटली. या ठिकाणी महापालिकेची जलमंदिर तसेच ससून केंद्राची जलवाहिनी आहे. ती ससून हॉस्पिटल परिसरातील 27 इंची व्हॉल्वला जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे, गळती थांबवण्यासाठी पालिकेस हा मुख्य व्हॉल्व बंद करावा लागला.
या भागात पाणी बंद
घोरपडी, लष्कराचा काही भाग, कॅम्प, पुणे कॅन्टोन्मेंट, सोमवार पेठ, जुना बाजार परिसर, मंगळवारपेठ, कोरेगाव पार्क, ताडिवाला रस्ता, पुणे स्टेशन परिसर, ससून परिसर, पाटील इस्टेट झोपडपट्टी, वाकडेवाडी परिसर, शिवाजीनगर जुनी पोलीस वसाहत, पुणे विद्यापीठ रस्ता परिसर.