Post Office Saving Scheme: आर्थिक सल्लागार नेहमीच सांगत असतात की आपल्या कमाईतील काही रक्कम ही विविध योजनामध्ये गुंतवणूक करावी. जेणेकरून आपल्याकडील पैसे वाढतील आणि बचतीची सवय लागेल. पैसे गुंतवणूकीचे अनेक पर्याय आहेत. त्यामध्ये पोस्ट खात्याच्या योजनाकडे विश्वासाने पाहिले जाते. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या अशाच एका योजनेबाबत माहिती देणार आहोत. जेथून तुम्हाला चांगले व्याज मिळेल.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीम –
पोस्टाच्या या विशेष योजनेचे नाव आहे, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीम. तुम्ही या योजनेत पाच वर्षापर्यंत गुंतवणुक करु शकता. त्यानंतर खूप चांगला परतावा मिळतो. या योजनेचा व्याजदरही चांगला आहे. तुम्हाला 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. 1 एप्रिल 2023 रोजी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेमध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध व्याजदरात सुधारणा करण्यात आली होती. 7 टक्क्यांवरून 7.5 टक्के व्याजदर वाढवण्यात आले होते.
गुंतवणुकदारांमध्ये ही योजना खूप लोकप्रिय झाली आहे. या बचत योजनेत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी गुंतवणुक करु शकता. जर तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळेल, तुम्ही 2 किंवा 3 वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला 7 टक्के व्याज मिळेल आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 7.5 टक्के व्याज मिळेल.
पाच वर्षांपर्यंत ग्राहकांने जर 5 लाखापर्यंतचे पैसे गुंतवले तर त्यावर 7.5 टक्के व्याज मिळते. त्या हिशोबाने 2,24,974 रुपयांचे व्याज मिळेल. आणि गुंतवणुक केलेली रक्कम मॅच्युर झाल्यानंतर 7,24,974 रुपये इतकी होईल. त्यामुळं या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला हमखास लाखो रुपयांची कमाई होईल.
टाईम डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला आयकर विभाग कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या बचत योजनेत एकल खाते किंवा संयुक्त खाते उघडता येते. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते त्याच्या कुटुंबातील सदस्याद्वारे उघडता येते. यामध्ये किमान 1,000 रुपयांमध्ये खाते उघडता येते. ज्यामध्ये व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर जोडले जातात. त्यामुळे गुंतवणूक करायची असल्यास तुमच्यापुढे पोस्टाच्या या योजनेचा चांगला पर्याय आहे.