पुणे – वाढत्या उन्हाळयामुळे पुणेकरांना उष्माघाता पासून असलेल्या धोक्या बाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेकडून पहिल्यांदाच सोशल मिडीयावर सोशल ट्रेन्ड असलेल्या “मिम्स’चा वापर करण्यात आला आहे. मात्र, हे मिम्स पुणेकरांच्या भेदक टोमण्यांमधून सुटलेले नाही. महापालिकेने हे मिम्सचे उद्योग सोडून.. पावसाळा तोंडावर आला असल्याने शहरातील खड्डे, अतिक्रमने, वाहतूक सुधारणा आणि मिम्स मध्ये भाषेकडे लक्ष द्यावे असा सल्लयांचा पाऊस महापालिकेच्या मिम्सवर पाडला आहे.
महापालिकेकडून गेल्या काही वर्षात पालिकेच्या कामकाजाची माहिती तसेच जनजागृती करण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर वाढविण्यात आल आहे. त्यासाठी खासगी संस्थाना कामे देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी तसेच उष्माघाताचा धोका टाळावा यासाठी सोशल माध्यमातून संदेश देणारे चार मिम्स पालिकेच्या फेसबुक पेजवर शेअर केली आहेत. त्यात, मराठी चित्रपटांसह, हिंदी चित्रपटात गाजलेल्या काही संवादाचा वापर करण्यात आलेला असून मराठीतील “नाळ’ चित्रपटातील ” हे मला सैन नाही होत.. ‘ तर अशी ही बनवा-बनवा चित्रपटील ” फार उपकार होतील हो तुमचे.. असे संवाद वापरण्यात आले आहे.
असे आहेत.. पुणेकरांचे महापालिकेचे टोमणे
* एकीकडे टेकडी फोडता… नदीकाठची झाडे हजारो झाडे तोडता आणि उष्माघाताचे मिम्स करता अशी अक्काल येते तरी कुठून
* असे फोटो एडिट करण्यापेक्षा आधी पावसाळापूर्व कामे पूर्ण करा
* आधी खड्डे आणि रस्ते दुरूस्तीची बनवा-बनवी थांबवा
* पुणेकर कधी पासून मले-तुले करायला लागले सरळ मराठीत लिहा
* ऑक्सिजन पार्क, नदीकाठ विकसनसाठी झाडे तोडा आणि असे सल्ले द्या तुमचा सत्कारच करायला हवा
* तुम्ही तुमची कामे नीट करा.. पुणेकरांना या अपेक्षा नाहीत तुमच्याकडून
* अशा कामांसाठी आम्ही कर भरतो का ? आधी लोकांच्या समस्या बघा
* शहरात खड्डे, रस्ते , ड्रेणेज, पाणी समस्या आहेत त्या सोडवा.. मिम्स काय टाकत बसलेत.