पुणे : पुणे महानगरपालिका अभियंता संघाकडून वतीने बेघर,विकलांग लोकांसाठी व मजूरांसाठी तब्बल 900 अन्नधान्य किट तयार करण्यात आले आहेत. तर नायडू हॉस्पीटल, महापालिकेच्या स्मशानभूमी आणि करोना रुग्णाच्या उपचाराचे काम सांभाळणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 200 वैयक्तिक सुरक्षा किटही महापालिका आयुक्तांकडे हस्तांतरित करण्यात आली असल्याची माहिती अभियंता संघाचे सचिव सुनील कदम यांनी दिली. यावेळी अभियंता संघाचे संजय पोळ, दिनेश गिरोला आणि हर्षदा शिंदे उपस्थित होत्या.
लॉकडाऊन मुळे शहारत मोठ्या प्रमाणात मजूर तसेच बेरोजगार अडकुन पडले आहेत. शहरात असलेल्या बेघरासाठी तातडीनं मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी अभियंता संघाने दैनंदिन गरजेचे साहित्य असलेले 10 हजार कीटचे वितरण करण्याचे उदिष्टे ठेवले आहे. एका कीटची किमंत
७०० रुपये असून प्रत्येक अभियंत्याने किमान १० कीटची रक्कम जमा करावी असे आवाहन संघाच्या वतीने अभियंत्यांना करण्यात आले होते.
या कामासाठी अभियंता संघाने एक एजन्सी निश्चित केली असून या एजन्सीच्या माध्यमातून हे किट तयार करून वितरीत केलं जाणार आहे. या किट मध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल, साबण, चहा पावडर, मसाला असे साहित्य दिले जाणार होते. त्यासाठी अभियंता संघाच्या सर्वच सदस्यांनी प्रतिसाद दिला असून आता पर्यंत 900 किट तयार करण्यात आले आहे.
हे किट महापालिकेच्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तीसाठीच्या मदत कक्षाला देण्यात आले आहेत. त्यातील काही किट शिल्लक असून उर्वरित किट संपे पर्यंत अभियंता संघाने सुमारे 200 पीपीई किट आरोग्य विभागसाठी खरेदी केले असून ते आयुक्तांकडे हस्तरीत करण्यात आले आहेत. या सर्व मदतीचे नियोजन संघाचे कार्यकारी अध्यक्ष आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या सूचना नुसार करण्यात येत असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.