पिंपरी – चार आयफोन खरेदी करून त्याचे पैसे एनईएफटीद्वारे पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून सहा लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार रविवारी (दि.22) दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेपाच वाजताच्या कालावधीत चिंचवड यडथील ऍपल स्टोअरमध्ये घडला.
संजय सार्थक नावाच्या ग्राहकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुशांत सुनील गुजर (वय 36, रा. लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे त्यांच्या स्टोअरमध्ये असताना आरोपी संजय सार्थक ग्राहक बनून स्टोअरमध्ये आला. त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून चार नवीन आयफोन खरेदी केले.
त्याचे पैसे कंपनीच्या बॅंक खात्यावर एनईएफटीद्वारे पाठवतो, असे सांगून त्याने पाच लाख 99 हजार 600 रुपये कंपनीच्या खात्यावर पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट फिर्यादींना दाखवला. मात्र कंपनीच्या खात्यात पैसे आले नसल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी फसवणूकीची तक्रार दिली आहे.