Pilot Aarohi Pandit – लहानपणापासूनच तिचे विमान चालवण्याचे स्वप्न होते. त्यामुळेच तिने तरुण वयातच एव्हिएशन सेक्टरमध्ये पदार्पण केले आणि तिचे स्वप्न सत्यात उतरले. या तरुणीचे नाव आहे कॅप्टन आरोही पंडित. तिने महिलांच्या क्षमतांच्या अमर्याद सीमा पुन्हा एकदा स्वतःच्या कामगिरीने अधोरेखित केलेल्या आहे. तिने आत्तापर्यंत एकटीने विमान चालवत अटलांटिक समुद्र पार केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या मोहिमेमध्ये तिने एकटीने विमान चालवत प्रशांत महासागर ओलांडलेला आहे. तिने आता ए-३२० प्रकारातील विमानाच्या उड्डाणाचे प्रशिक्षण पियर सेवन एव्हिएशन अकॅडमीतून पूर्ण केलेले आहे. हा स्काय वन एफझेडइ यांचा उपक्रम आहे.
वयाच्या 26 व्या वर्षी कॅप्टन आरोही पंडितने अतिशय प्रभावी कामगिरी करून दाखवलेली. विमान उडाणाच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आवर्जून नोंद करण्यासारखा मुद्दा म्हणजे तिच्या या कामगिरीची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. हलक्या आणि क्रीडा प्रकारातील विमानातून एकटीने प्रवास करत अटलांटिक आणि प्रशांत महासागर ओलांडण्याची कामगिरी करणारी ती जगातील पहिली महिला आणि तरुणी ठरलेली आहे.
कॅप्टन आरोही पंडित म्हणते, तिला नेहमीच हाती घेतलेले काम तडीस नेण्याची सवय आहे. याच प्रेरणेतून तिने अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागर विमानातून एकटीने ओलांडण्याची कामगिरी केली आहे.
ती म्हणते, विमान चालवणे हा तिच्यासाठी जिवापाड आवडीचा विषय आहे. विमान चालवणे तिच्यासाठी सातत्याने झोकून देऊन करण्याचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. विमानाचे उड्डाण आणि लँडिंग हे तिच्यासाठी आनंददायी ठरतात. त्याचबरोबर विमानाच्या इंजिनांची जबरदस्त शक्ती आणि श्वास रोखून धरायला लावणारा वेग याची तिला अतिशय आवड आहे. आजही विमान चालवायचे म्हटले की ती रोमहर्षित होते.
विमान उड्डाणासाठीचा अमर्याद उत्साह
ती म्हणते, मला निसर्गाची आवड आहे वेगाची तहान आहे आणि उंचावरून विमान उड्डाण करण्यासाठीचा अमर्याद उत्साह माझ्याकडे आहे. कॅप्टन आरोही पंडितने देशासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी केलेली आहे. ती म्हणते, भारतात जगामध्ये सर्वाधिक संख्येने महिला पायलट आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. मी सध्या इंडियन वुमन पायलट्स असोसिएशन अर्थात आयडब्ल्यूपीए या संस्थेची सदस्य आहे आणि या संस्थेने मला अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. तसेच महिलांनी विमान उड्डाणाच्या क्षेत्रात यावे यासाठी पाठबळ आणि प्रेरणा देण्यात ही संस्था नेहमीच आघाडीवर असते.
नुकतेच तिने ए320 प्रकारातील व्यावसायिक वापरासाठीच्या विमान उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून स्वतःच्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवलेला आहे. 500 किलो वजनाच्या विमानाचे उड्डाण करायचे इथपासून ते मालासह 75 टन वजन असलेल्या विमानाचे उड्डाण करणे ही मोठी आव्हानात्मक जबाबदारी होती. परंतु तिचे इन्स्ट्रक्टर कॅप्टन ख्रिस्तोफर यांच्या मार्गदर्शनाखाली तिनेही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. करिअरच्या नव्या टप्प्यासाठी तिने विशेष कौशल्य प्राप्त केलेले आहे. सुरुवातीची अनिश्चितता आणि कॉकपीट मधील गुंतागुंतीच्या गोष्टींवर निर्विवाद नियंत्रण मिळवणे हे तिला शक्य झालेले आहे ते केवळ तिची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास यामुळे कष्टानंतरच यश प्राप्त होते.
तिच्या प्रशिक्षणाचा अनुभव सांगताना ती म्हणते, जवळपास पाच वर्ष मी ग्लायडर फ्लाईंग आणि फेरी फ्लाइट्स मध्ये सहभागी होते, परंतु मी करिअरमध्ये जशी प्रगती केली तसतशी नवी क्षितिजे दिसू लागली आणि संधी मिळाल्या. मी नव्या विमानासाठी पायलट म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि व्यावसायिक वाहतुकीसाठीची विमानांचे उड्डाण करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे त्यासाठी मी आता एक ए३२० प्रकारातील व्यावसायिक वापरासाठीच्या विमानांचे पायलट म्हणून काम करू लागलेली आहे.