करोनाचा कहर! नांदेडमध्ये 1000 पार करोना बळी; अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वेटींगवर

नांदेड – जिल्ह्यातील करोना बळीचा आकडा शुक्रवारी 1000 पार गेला. करोनाच्या दुसऱ्या लाटेचे रौद्ररूप सध्या नांदेडकर अनुभवत आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल 36 मृतदेहांवर नांदेड येथील गोवर्धनघाट स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी 13 मृतदेह वेटिंगवर होते. स्मशानभुमीतील हे चित्र अंगावर काटा आणणारे होते.

नांदेड जिल्ह्यात करोना प्रार्दुभावाचा उद्रेक झाला आहे. विशेषतः दुसऱ्या लाटेत मृत्यूदर भयावह असल्याचे दिसून येते. मागील अवघ्या 9 दिवसात या स्मशानभुमीत तब्बल 250 पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सोमवार 5 एप्रिल रोजी 36, मंगळवारी 44, बुधवारी 42 तर गुरूवारी 29 जणांवर या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुक्रवारचे चित्र तर थरकाप उडविणारे होते. सकाळी 8 ते 2 या सहा तासांत येथे 23 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान नांदेड वाघळा महानगर पालिकेने करोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणा उभारली आहे.

मनपाच्या सहा झोनमधील पथक आलटून-पालटून प्रत्येकी एक आठवडा अंत्यसंस्काराची जबाबदारी सांभाळत आहे. येथे अंत्यसंस्कारासाठी आल्यानंतर मृतदेहाला भडाग्नी देणाऱ्या नातेवाईकाला तसेच अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हाताळणाऱ्या नातेवाईकाला मनपातर्फे पीपीई कीट देण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.