जुलै किंवा ऑक्टोबर या दोन विंडोंबाबत चर्चा
नवी दिल्ली – करोनाचा धोका वाढत असला तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आयोजित करण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. ही स्पर्धा जुलैमध्ये किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत घेता येईल का याचाही आढावा घेतला जात असून देशातील लॉकडाऊनबाबत केंद्र सरकार बुधवारी पुढील निर्णय जाहीर करणार आहे त्याचवेळी या स्पर्धेबाबतही सर्व चित्र स्पष्ट करण्यात येईल अशी माहिती मंडळाच्या सूत्रांनी दिली.
क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि श्रीमंत क्रिकेट स्पर्धा असा आयपीएलचा उल्लेख केला जातो. यंदा ही स्पर्धा 29 मार्चपासून सुरु होणार होती. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. याच दिवशी लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाणार असल्याने त्यावेळची परिस्थिती पाहुन स्पर्धेबाबत निर्णय घेतला जाईल असे संकेतही या सूत्राने दिले.
याबाबत मंडळाकडून व्हिडीओ कॉन्फरंन्सिगवर एक बैठक घेण्यात येणार आहे. मात्र, या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना प्रवेश बंदी करण्यात येणार असून स्पर्धेशी निगडीत व्यक्तींनाच केवळ प्रवेश दिला जाईल. तसेच देशातील 2 ते 3 मैदानांवरच ही स्पर्धा जास्तीतजास्त डबल हेडरच्या (एका दिवशी दोन सामने) आराखड्यानुसार खेळविली जाईल, असेही या सूत्राने स्पष्ट केले.