जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) शहीद झाला. तर आणखी एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला. ती घटना किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम भागात असणाऱ्या गावात घडली. बासित इक्बाल आणि विशाल सिंह हे एसपीओ गस्तीसाठी बाहेर पडले होते.
त्यांच्यावर दहशतवाद्यांच्या एका गटाने अचानकपणे हल्ला केला. एसपीओंवर कुऱ्हाडींनी घाव घालण्यात आले. त्या हल्ल्यात इक्बाल मृत्युमुखी पडले, तर सिंह जखमी झाले. त्यांच्या रायफली घेऊन दहशतवाद्यांनी पलायन केले. हल्लेखोर दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी तातडीने मोहीम हाती घेतली. गंभीर जखमी झालेल्या सिंह यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने जम्मूला हलवण्यात आले. किश्तवाडमधील ताज्या घटनेने त्या जिल्ह्यात चालू वर्षातील पहिल्या दहशतवादी हल्ल्याची नोंद झाली आहे.