आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विदित गुजराथी विजेता

पुणे – महाराष्ट्राच्या ग्रॅंडमास्टर विदित गुजराथीने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅंडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्‍यपदाला गवसणी घातली. नाशिकच्या या 24 वर्षीय खेळाडूने या स्पर्धेत अनेक नामांकित खेळाडूंना मागे टाकत ही कामगिरी केली.

बिएल येथे झालेल्या या स्पर्धेत माजी विश्‍वविजेता पीटर लेको, जागतिक कनिष्ठ अजिंक्‍यवीर परहाम मेघसुदालो, अग्रमानांकित सॅम्युएल शॅकलॅंड, जॉर्ज कोरी, नोदिरबेक अब्दुसॅतोरोव्ह, निको जिओर्जीदिस आदी अव्वल खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत क्‍लासिकल व जलदचे प्रत्येकी 7 डाव, ब्लिट्‌झच्या 14 डावांचा समावेश होता. विदितने 49 गुणांपैकी 31 गुणांची कमाई केली. त्यामध्ये त्याने क्‍लासिकलमध्ये 12 गुण, जलदमध्ये 8 गुण तर ब्लिट्‌झमध्ये 11 गुणांचा समावेश होता. त्याला सात लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. शॅकलॅंडने 27 गुणांसह उपविजेतेपद पटकाविले. लेकोने तिसरा क्रमांक मिळविताना 24.5 गुणांची नोंद केली.

प्रेरणादायक विजेतेपद- विदित

लेको व शॅकलॅंड यांच्यासह अनेक बलाढ्य खेळाडूंचा समावेश असल्यमुळे विजेतेपदाची खात्री नव्हती. तरी मी कोणतेही दडपण न घेता खेळण्यावर भर दिला. या स्पर्धेत सर्वच प्रकारच्या डावांचा समावेश असल्यामुळे तेथे स्पर्धकांच्या सर्वांगीण कौशल्याची कसोटी होती. त्यामुळेच येथील विजेतेपद माझ्या भावी करिअरसाठी प्रेरणादायकच आहे. आक्रमक तंत्राचाच उपयोग करीत मी येथे खेळलो. त्याचाच फायदा मला येथे झाला. सध्या माझे 2703 फिडे मानांकन गुण आहेत. 2750 गुणांचा टप्पा मला पार करावयाचा आहे. हा टप्पा ओलांडल्यानंतर मला आणखी अव्वल दर्जाच्या खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळेल असे विदितने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.