लॉकडाऊनमध्येही खेळाडूंचा तंदुरुस्तीवर भर

नवी दिल्ली – करोनाचे सावट असले तरीही कर्णधार विराट कोहलीचा भारतीय संघ आगामी स्पर्धांसाठी सज्ज राहण्यासाठी घाम गाळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाऊन जारी केला आसला तरीही खेळाडू आपापल्या खासगी जिममध्ये फिट राहण्यासाठी व्यायामावर भर देत आहेत.

आगामी 21 दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. भारतातच नव्हे तर जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ज्या स्पर्धेबाबत गेले कित्येक दिवस कवित्व सुरू होते ती ऑलिम्पिक स्पर्धा देखील पुढे ढकलली गेली आहे. क्रिकेटबाबत बोलायचे झाले तर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अगदी गल्ली क्रिकेटदेखील बंद झाले आहे. लॉकडाऊनमुळे आता खऱ्या अर्थाने लोकांना करोनाचे गांभीर्य समजले आहे. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सर्व पात्र खेळाडू सरावावर लक्ष केंद्रित करत होते. मात्र, आता ही स्पर्धाच पुढे गेल्याने त्यांनाही आता लाभदायक ठरणारा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. या खेळाडूंच्या बरोबरीने भारतीय संघाचे क्रिकेटपटू देखील आपल्या तंदुरुस्तीवर भर देत आहेत. सलामीवीर शिखर धवन धुणी-भांडी करत असलेला व्हिडीओ जरी सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरीही तो घरातच हॅंगिग बॉलवर फलंदाजीचाही सराव करत आहे. त्याच्यासह कोहली, रोहित शर्मा, मनीष पांडे, ऋषभ पंत, मयांक अग्रवाल तसेच गोलंदाज जसप्रीत बुमराह, महंमद शमी हेदेखील वैयक्‍तिक जिममध्ये फिटनेसवर भर देत आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंना करोनाच्या धोक्‍यामुळे घरीच राहण्याचा सल्ला दिला असला तरीही आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करू नका, व्यायाम तसेच अन्य शारीरिक तंदुरुस्तीवर भर द्या, असेही सुचविले आहे. पडत्या फळाची आज्ञा समजून आता भारतीय क्रिकेटपटू जेव्हा केव्हा करोनाचा धोका संपुष्टात येईल त्यानंतर स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर होईल त्यावेळी आपण पूर्ण तंदुरुस्त असावे या हेतूने खरोखरच फिटनेस फंडा दाखवत आहेत.

खेळाडू घरीच असले तरीही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे फिटनेस तज्ज्ञ फिजिओ नितीन पटेल तसेच निक वेब यांच्याशी संपर्कात आहेत. जे खेळाडू देशाच्या संघाकडून खेळतात त्यांनी आपल्या तंदुरुस्तीकडे कानाडोळा करू नये अशा शब्दांत या दोघांनीही खेळाडूंना सूचना केली आहे. खरेतर खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहभागी झाले होते. मात्र, धर्मशालातील पहिला सामना पावसाने रद्द झाला व त्यानंतर करोनाचा धोका वाढल्याने उर्वरित मालिकाही रद्द झाली. तसेच इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) पुढे ढकलली गेली. मुळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा रविवारपासून सुरू होणार होती. आता ही स्पर्धा जरी 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली असली तरीही करोनाचे सावट इतक्‍यात कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने येत्या एक-दोन दिवसांत ही स्पर्धाही रद्द केली जाण्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. त्यामुळे खेळाडूंना आपली तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे.

चहर, भुवीला लाभ……

दुखापतीतून सावरत असलेला दीपक चहर व फिट ठरलेला भुवनेश्‍वर कुमार यांना प्रत्यक्ष स्पर्धेत खेळ करत आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्याची संधी अद्याप मिळालेली नाही. मात्र, आता या अतिरिक्त वेळात ते आपला फिटनेस कायम ठेवण्यासाठी सज्ज आहेत. सध्या कोणत्याही स्पर्धा सुरू नसल्याने त्यांना खरेतर हा वेळ लाभदायकच ठरत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.