अहमदाबाद – मोठा बोलबाला झालेल्या आपच्या एन्ट्रीमुळे गुजरात विधानसभा निवडणुकीला तिरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, आपने केवळ हवा निर्माण केली आहे. जमिनीस्तरावर त्या पक्षाचे फारसे अस्तित्व नसल्याचे प्रतिस्पर्धी पक्षांना आणि राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. त्यामुळे गुजरातमध्ये आपली फक्त हवा नसल्याचे दाखवून देण्याचे मोठे आव्हान आपपुढे उभे ठाकले आहे.
आतापर्यंत गुजरातमधील राजकारण भाजप आणि कॉंग्रेस या दोन पक्षांभोवतीच फिरत होते. मात्र, आपमुळे यावेळच्या तेथील निवडणुकीची समीकरणे बदलू शकतात, असे चित्र पुढे आले आहे. अर्थात, तसे चित्र पुढे करण्यात आपचे आक्रमक प्रचारतंत्रच बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहे. तो पक्ष स्वत:ला भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून प्रोजेक्ट करत आहे. पण, कॉंग्रेसला मागे सारून ती जागा व्यापण्यात आप यशस्वी होणार का, हा खरा प्रश्न आहे.
गुजरातमध्ये कॉंग्रेसची स्वत:ची मतपेढी असल्याचे मागील निवडणुकांवरून स्पष्ट झाले आहे. तशी मतपेढी अद्याप आपकडे नाही. त्याशिवाय, आपचे पक्ष संघटनही भाजप आणि कॉंग्रेसच्या तुलनेत दुबळे आहे. त्या पक्षाकडे तगडे मानता येतील असे नेतेही नाहीत. आपने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून इसुदान गढवी यांचे नाव पुढे केले. गढवी यांनी पत्रकार म्हणून मोठा नावलौकिक मिळवला हे खरे आहे. पण, राजकारणात ते नवखे आहेत. वर्षभरापूर्वी ते आपचा भाग बनले. राजकीय नेता म्हणून अगदी कमी कालावधीत जनता त्यांना स्वीकारणार का, हाही प्रश्न आहेच.
गुजरात जिंकण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या आपपुढे भाजपच्या रूपाने प्रचंड आव्हान उभे आहे. भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा मोठा करिष्मा असणारा नेता आहे. त्याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखा निवडणूक व्यवस्थापनातील निष्णात रणनीतीकारही आहे. त्यामुळे भाजपचा अभेद्य बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातवर झेंडा फडकावणे आपला वाटते तितके सोपे निश्चितच नाही.
अर्थात, गुजरातमध्ये आपने इतर प्रतिस्पर्ध्यांना दखल घेणे भाग पाडल्याचे दिसते. आपची इतर पक्षांपेक्षा वेगळी वाटणारी कार्यशैली प्रामुख्याने मध्यमवर्गाला आकर्षित करणारी आहे. त्याशिवाय, मोफत वीज, बेरोजगारांना भत्ता, महिलांना अर्थसहाय्य यांसारख्या आपकडून देण्यात येणाऱ्या हमी मतदारांना त्या पक्षाकडे झुकण्याबाबत विचार करायला लावणाऱ्या आहेत. आता गुजरातमधील मतदार आपला कसा प्रतिसाद देणार हा विषय कुतूहल वाढवणारा ठरला आहे.