Mohammad Nabi – अफगाणिस्तान संघाची टी-२० विश्वचषक ( T20 WorldCup 2022 ) मोहीम निराशाजनक राहिली आहे. सुपर-१२ च्या गट-१ मध्ये अफगाणिस्तानचा संघ ५ सामन्यांत ३ पराभव तर २ सामने पावसामुळे रद्द झाले. मात्र, अंतिम सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार खेळ दाखवला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाला अगदी विजयाच्या जवळ जाऊन ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, या सामन्यानंतर अफगाणिस्तान कर्णधार मोहम्मद नबीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. नबीने सामन्यानंतर लगेचच आपल्या पदाच्या राजीनाम्याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
#AFGvsAUS । अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचे गणित बिघडवले; सामना जिंकूनही कांगारूंचा तोटाच!
नबीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ” अशा प्रकारे आमची टी-२० विश्वचषक ( T20 WorldCup 2022 ) मोहीम संपली आहे, ज्याची आम्हाला आणि आमच्या समर्थकांना मुळीच अपेक्षा नव्हती. तुमच्याप्रमाणेच आम्हीही सामन्यांच्या निकालाने निराश झालो आहोत. गेल्या वर्षभरापासून संघाची तयारी मोठ्या स्पर्धेसाठी कर्णधाराला हवी तशी झाली नाही. गेल्या अनेक दौऱ्यांमध्ये मी, संघ व्यवस्थापक आणि निवड समिती एकाच मतावर राहिलो नाही. त्यामुळे संघाच्या संतुलनावर याचा मोठा परिणाम झाला. म्हणूनच मी कर्णधारपदाचा तत्काळ राजीनामा देत आहे. व्यवस्थापन आणि संघाची इच्छा असल्यास मी एक खेळाडू म्हणून माझ्या देशासाठी खेळत राहीन.”
नबी पुढे म्हणाला की, “पावसामुळे सामन्यावर परिणाम होऊनही मैदानात आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुमचे प्रेम आमच्यासाठी खूप आहे.” अशा शब्दांत नबीने चाहत्यांचे आभार मानले. त्याचबरोबर नबीने पोस्टच्या शेवटी ‘अफगाणिस्तान जिंदाबाद’ असेही लिहिले.
— Mohammad Nabi (@MohammadNabi007) November 4, 2022
शुक्रवारी झालेल्या सामान्यात ( AFG vs AUS ) सुरुवातीला नाणेफेक जिंकल्यानंतर अफगाणिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मॅक्सवेलच्या ५४ आणि मिचेल मार्शच्या ४५ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ८ बाद १६८ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाने ठराविक अंतराने गडी गमावले. त्यामुळे अफगाणिस्तान संघ २० षटकांत ७ गडी गमावून १६४ धावाच करू शकला. महत्वाचं म्हणजे रशीद खानने अखेरीस येऊन मोठी फटकेबाजी करत ४८ धावांची नाबाद खेळी केली.