मुंबई – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे भारतात गुरुवारी सोने आणि चांदीचे दर कमी झाले. दिल्ली सराफात सोन्याचे दर 714 रुपयांनी कमी होऊन 50,335 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. गुरुवारी तयार चांदीचा दर 386 रुपयांनी कमी होऊन 69,708 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,916 डॉलर प्रति औंस व चांदीचे दर 27.9 डॉलर प्रति औंस झाले. अमेरिकेतील लवचीक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती, करोना व्हायरसचे वाढत असलेले रुग्ण या कारणामुळे शेअर, चलन आणि इतर बाजारात अस्थिरता आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावरही होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.