पिंपरी-चिंचवड शहरातील 25 टक्‍के सोसायट्या ‘फायर ऑडिट’ अहवाला विनाच

धोकादायक ठरु शकतो नागरिकांचा निष्काळजीपणा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक सोसायटीधारकांनी आगीपासून सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेले नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील सोसायट्यांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी फिक्‍स फायर फायटिंग इन्स्टॉलेशन, फायर एक्‍स्टिंग्विशअर व इतर सुविधा बसविणे आवश्‍यक आहे. परंतु, अनेक सोसायटींमध्ये या सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असून शहरातील सुमारे 25 टक्‍के सोसायट्यांनी महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडे फायर ऑडिटचा अहवाल सादर केला नसल्याचे धक्‍कादायक चित्र दिसून येत आहे.

कित्येक सोसायट्यांमध्ये आगीपासून सुरक्षा करणारी यंत्रणाच नाही

प्रत्येक सोसायटीमध्ये नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे. सोसायटीमध्ये सुरक्षेसाठी फायर एक्‍स्टिंग्विशअर, लिफ्ट सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक याप्रकारच्या सुविधा देणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक ठिकाणी हे नियम पाळले जात नसल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी या सुविधा पुरवूनही सुरक्षेच्या साहित्यांची दूरवस्था झाली आहे.

फिक्‍स फायर फायटिंग इन्स्टॉलेशनमध्ये प्रत्येक मजल्यावर केवळ मशीनचा लाल बॉक्‍स दिसत असून त्यामध्ये पाईपच नसल्याने आढळून आले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास आग लागल्यानंतर विझवायची कशी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तसेच, शहरातील कित्येक सोसाटींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे दिसून आले आहे.

नियम धाब्यावर

नियमानुसार सोसायटीधारकांनी फायर ऑडिटचा अहवाल महापालिकेच्या अग्निशामक विभागाला दर सहा महिन्यांनी सादर करणे बंधनकारक असते. मात्र, हा अहवाल सादर न करता बिनदिक्कतपणे सोसायटीधारक राहत आहेत. परिणामी सोसायटीधारक सुरक्षेच्या नियमांना केराची टोपली दाखवत अग्निशामक दलाला जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे, नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.