नवी मुंबई – एल्गार परिषद अणि माओवादी संबंधावरून अटक केलेले आदिवासी हक्क कार्यकर्ते फादर स्टान स्वामी यांना सीपर आणि अन्य सुविधा त्यांना अटक केल्याच्या दुसऱ्या दिवसांपासून देण्यात येत आहेत.
स्वामी यांना पर्किन्सससह अनेक आजारांनी ग्रासले आहे. त्यांना आठ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तळोजा कारागृहात आहेत. त्यांना सीपर आणि स्ट्रॉ पुरवले जात नाहीत, हा आरोप निखालस खोटा आहे.
केवळ स्ट्रिपर आणि स्ट्रॉच नव्हे तर व्हीलचेअर, चालण्याची काठी, वॉकर आणि दोन मदतनीसही दिमतीला देण्यात आले आहेत, असे एका वरीष्ठ कारागृह अधिकाऱ्याने सांगितले. ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
ते पर्किन्ससने ग्रस्त आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. मग आम्ही त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा का देणार नाही, असा सवाल या अधिकाऱ्याने केला. दरम्यान, दिल्लीतील काही वकीलांनी शनिवारी स्वामी यांच्यासाठी काही स्वीपर आणि स्ट्रॉचे पार्सल तळोजा कारागृहात पाठवले. त्यासोबत एक पत्रही पाठवण्यात आले आहे.
सर्व कारागृहांच्या आचरासंहितेत बंदीजनांना विशेष गरजा असतील तर त्यासाठी विशेष सवलत देण्याची तरतूद आहे. ती पुरी होत नसल्याबद्दल एक वकील म्हणून आम्हाला खेद वाटतो. न्यायलयीन कोठडीत असताना एखाद्याला पाणी पिण्याचा हक्क मिळू नये, हे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन आहे, असे या पत्रात वकील नंदिता राव यांनी म्हटले आहे.
त्यांना अटक करताना राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांच्याकडील स्ट्रॉ आणि सीपर जप्त केले आहेत. ते परत देण्याचे आदेश एनआयएला द्यावेत, अशी मागणी करणारी स्वामी यांची याचिका न्यायालयाने गुरूवारी फेटाळली होती. त्यानंतर स्वामी यांनी सीपर आणि स्ट्रॉ देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. आजारामुळे आपले हात थरथरत असतात त्यामुळे खाताना अथवा पिताना मला त्रास होतो, असे या याचिकेत म्हटले आहे.