सेऊल – करोनाची साथ पुन्हा पसरायला लागली असल्याने दक्षिण कोरियामध्ये वर्षाच्या अखेरीला होणाऱ्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. “इयर एन्ड’व्यतिरिक्त संगीताच्या काही कार्यक्रमांवरही प्रशासनाने बंदी घातली आहे.
करोनाची साथ ज्या प्रमुख देशांमध्ये वाढते आहे, त्यात दक्षिण कोरियाचाही समावेश आहे. तेथे सध्या दररोज सरासरी 500 नवीन रुग्णांची नोंद होत आहे, असे “कोरिया डिसीज कंट्रोल ऍन्ड प्रिव्हेन्शन एजन्सी’ने म्हटले आहे.
कोरियामध्ये सध्या करोनाची तिसरी लाट येत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या 9 महिन्यांमध्ये तेथे करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढायला लागण्याची तिसरी वेळ आली आहे. लष्करी केंद्रे, शाळा आणि चर्चमध्ये नियमित येणाऱ्यांना ही लागण झाल्याचे आढळून आले आहे.
प्रामुख्याने राजधानी सोल आणि आसपासच्या शहरी भागात करोना विषाणूचे संक्रमण होण्याची शक्यता असलेली एकत्रीकरणे आणि कार्यक्रमांवर निर्बंध अधिक कडक केले जातील, असे पंतप्रधान चुंग सिए-कुन यांनी सांगितले. हॉटेल, पार्टी रूम, गेस्ट हाऊस आणि इतर ठिकाणी होणाऱ्या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पार्ट्यांवर पूर्णपणे बंदी असेल, असेही कुन यांनी सांगितले.