लॉस एंजेलिस – कमालीचे सर्जनशील आणि निरंतर सक्रिय असणारे धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे उद्योजक ऍलन मस्क आता समाज माध्यमात उतरण्याची शक्यता जागतिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
ते ट्विटरवर कायम सक्रीय असतात आणि जगभरातील त्यांचे चाहते ट्विटरच्या माध्यमातून मस्क यांच्या संपर्कात असतात. आता तब्बल 7 कोटी 90 लाख फॉलोअर असलेल्या मस्क यांनी आपल्या चाहत्यांना सध्याच्या समाज माध्यमात अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नियमाचा किती अंमल केला जातो असे विचारले असता 20 लाख नागरीकांनी प्रतिसाद दिला.
Free speech is essential to a functioning democracy.
Do you believe Twitter rigorously adheres to this principle?
— Elon Musk (@elonmusk) March 25, 2022
त्यातील 70% नागरीकांनी सांगितले की, समाज माध्यमावर अभिव्यक्ती स्वतंत्र्याची फारशी दखल घेतली जात नाही. त्यानंतर मस्क यांनी असे ट्विट केले की जागतिक पातळीवर लोकशाही जिवंत राहण्यासाठी समाज माध्यमे स्वतंत्र राहण्याची गरज आहे.
Is a new platform needed?
— Elon Musk (@elonmusk) March 26, 2022
त्यानंतर त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की नवे समाज माध्यम आवश्यक आहे का? त्यानंतर गेल्या एक आठवड्यापासून समाज माध्यमावर या प्रश्नावर जोरदार चर्चा चालू आहे. काही चाहत्यांना वाटते की मस्क लवकरच ट्विटरला विकत घेण्यासाठी काही हालचाली करण्याची शक्यता आहे. तर काही फॉलोअर्सनी सांगितले की. मस्क ट्विटररला विकत घेण्याऐवजी एखादे नवे व्यासपीठ सुरू करू शकतात.
मरणाची भीती वाटत नाही
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी असलेले मस्क यांनी सांगितले की आपण जास्तीत जास्त काळ जगावे याकरिता आरोग्याची पूर्ण काळजी घेतो. मात्र दरम्यानच्या काळामध्ये जर मृत्यू ओढावला तर आपल्याला त्याची अजिबात भीती वाटत नाही. ते म्हणाले की मृत्यूमुळे उलट दगदगीतून सुटका झाल्यासारखे वाटेल. शून्यातून विश्व निर्माण केलेले मस्क सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचे समजले जाते. त्याचबरोबर ते एक लाख कोटी डॉलर्सची संपत्ती असणारे पहिले नागरिक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.